सुजय विखेंनी दिलेला शब्द पाळला नाही! तनपुरे साखर कारखान्यातील कामगार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

sujay-vikhe-patil

Lok Sabha Election 2024: तुमचा एक रुपया बुडवणार नाही हा विखेंचा शब्द आहे, असं आश्वासन खासदार सुजय विखे यांनी वेळोवेळी कामगारांना दिलं. मात्र विखेंच्या काळातील तनपुरे साखर कारखाना कामगारांचे 17 महिन्यांचे थकीत पगार, दोन बोनस, 14 ते 18 टक्के फरकाची रक्कम अद्याप मिळाली नसल्याने तनपुरे साखर कारखाना कामगार युनियनने आपली पुढील दिशा ठरविण्यासाठी 15 एप्रिल रोजी कामगारांचा महामेळावा आयोजित केला असून त्यात पुढील दिशा स्पष्ट केली जाणार असल्याचे युनियन पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कामगारांनी थकीत पगारासाठीची मागणी पुढे आणल्याने खासदार विखेंची डोकेदुखी वाढणार असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

गुरुवारी सकाळी युनियनच्या कार्यालयात यूनियचे अध्यक्ष गजानन निमसे, उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग, सेक्रेटरी सचिन काळे, माजी अध्यक्ष इंद्रभान पेरणे व अन्य पदाधिकारी व सदस्य यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

यावेळी बोलताना अर्जुन दुशिंग म्हणाले की, माझ्या काळातील एक रुपया बुडवणार नाही असा शब्द खासदार सुजय विखेंनी दिला त्याच आशेवर आम्ही आजपर्यंत राहिलो. जिल्हा बँकेने जप्ती आणली असता कामगारांनी विरोध न करता कारखान्याचे टेंडर निघून कोणी उद्योगपती अथवा खासदार सुजय विखे कारखाना ताब्यात घेतील आपले चांगले होईल. या एकमेव आशेने जिल्हा बँकेस सहकार्य केले. मात्र कामगारांना घरी जाण्याची दुर्दैवी वेळ आल्याने कामगार हतबल झाला. थकीत पगारप्रश्नी खासदार सुजय विखेंना राहुरी मार्केट कमिटी निवडणूक, गणेश कारखाना निवडणूक वेळी भेटलो आमचा विचार करा अशी मागणी केली. मात्र त्यांनी निवडणूक होऊ द्या, निकाल झाल्यावर आपण एकत्रित बसून चर्चा करू मात्र तसे काहीही झाले नाही.

तनपुरे कारखान्याचे सर्व कर्मचारी मागच्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंबरोबर राहीले, सर्वांनी उत्साहाने काम केले. आता पुन्हा लोकसभा निवडणूक लागली, आता कामगारांना विचार करण्याची वेळ आली आहे. आम्ही भिक मागत नाही, आमच्या घामाचे थकीत द्या, आमचा पगार व बोनस द्या, आम्हाला राजकारण करायचं नाही आठ दिवसात आमच्या मागण्यांचा विचार करा अन्यथा 15 एप्रिलच्या महामेळाव्यात आमची भूमिका स्पष्ट करू असे दुशिंग म्हणाले.

सचिन काळे म्हणाले की, तनपुरे कारखाना कामगारांनी आम्ही रक्ताच पाणी करून काम केले. थकित पगार व इतर मागण्यांसाठी आम्ही कामगारांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहून उपोषण- आंदोलन केले. यासाठी आम्हाला जेलची हवा खाल्ली. मात्र पदरी निराशाच पडत गेली. जिल्हा बँकेने कारखान्यावर आणलेली जप्ती हा पूर्वनियोजित कट होता. त्यावेळी कामगार व युनियन यांना अंधारात ठेवले गेले. कामगारांच्या मागण्यांसाठी खा.सुजय विखे यांना वारंवार भेटलो एक दोन वेळा तर त्यांनी आमच्याकडे बघून न बघितल्यासारखे करत निघून गेले. कारखाना कॉलनी पाणी, विज, आरोग्य सुविधांचा अभाव असून त्याकडे कधीही लक्ष दिले नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भगवे टोपी उपरणे घालुन प्रचार केला, मात्र आता लोकसभा निवडणुक होत असून आम्हा कामगारांना विचार करण्याची वेळ आली. आम्हाल जराही राजकारण करायचे नाही परंतु आमच्या गोरगरीब कामगारांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सोमवार 15 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता लक्ष्मी नारायण मंदिर सभागृहात आदर्श आचारसंहितेचे पालन करून कामगारांच्या महामेळाव्यात आम्ही आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी सीताराम नालकर, बाळासाहेब तारडे, सुरेश तनपुरे, नामदेव शिंदे, नामदेव धसाळ, रामभाऊ ढोकणे, रावसाहेब ढुस, ईश्वर दुधे, राजेंद्र गागरे आदी उपस्थित होते.