IPL 2024 : हैदराबाद हेडमास्टर; ट्रव्हिस हेडचे 39 चेंडूंत शतक

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर धावांचा आणि षटकारांचा पाऊस पडला. बंगळुरूविरुद्धच्या विक्रमी रनयुद्धात हैदराबादच हेडमास्टर ठरला. ट्रव्हिस हेडच्या 39 चेंडूंतील शतकाच्या जोरावर हैदराबादने बंगळुरूविरुद्ध 287 धावांचा एव्हरेस्ट उभारत स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे. 288 धावांचा पाठलाग करताना दिनेश कार्तिकच्या 35 चेंडूंतील 83 धावांच्या झंझावाताने बंगळुरूच्या पराभवाचे शल्य थोडे कमी केले. हैदराबादने बंगळुरूचा 25 धावांनी पराभव केला.
तीन आठवडय़ांपूर्वी हैदराबादने 277 धावा ठोकून सांघिक धावांचा नवा आयपीएल विक्रम रचला होता. तो विक्रम ट्रव्हिस हेड आणि हेन्रिक क्लासनच्या आक्रमक फलंदाजीने मागे टाकला. हैदराबादने 3 बाद 287 धावा करताना टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली. गेल्या वर्षी नेपाळने मंगोलियाविरुद्ध 3 बाद 314 धावा केल्या होत्या. तो विश्वविक्रम हैदराबादपासून 27 धावा दूर राहिला.

हैदराबादच्या 288 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूला विराट कोहली आणि फाफ डय़ू प्लेसिसने 6.2 षटकांत 80 अशी सलामी देत सामन्यात जान आणली, पण विराट 20 चेंडूंत 42 धावा करून बाद झाला आणि बंगळुरू लक्ष्यापासून मागे पडू लागला. कर्णधार फाफने 62 धावा काढत आपली कामगिरी चोख बजावली, पण अन्य फलंदाजांनी निराश केले.

हेड ठरला गोलंदाजांची डोकेदुखी
आयपीएलमध्ये लवकरच 300 धावांचाही टप्पा ओलांडला जाणार असल्याचे संकेत पुन्हा एकदा हैदराबादने दिले. फाफ डय़ू प्लेसिसने नाणेफेक जिंकून हैदराबादला दिलेली फलंदाजी त्याच्या जिव्हारी लागली. आयपीएलमध्ये एकच चांगली खेळी खेळलेला ट्रव्हिस हेडने आज आपल्या फलंदाजीचा झंझावात आयपीएलला दाखवून दिला. त्याची फलंदाजी बंगळुरूच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली. त्याने 43व्या चेंडूंत संघाचे शतक फलकावर लावताना 20 चेंडूंत पन्नाशी गाठली. त्याने अभिषेक शर्माबरोबर 108 धावांची सलामी 8 षटकांतच दिली. त्यानंतरही हेडने आपली षटकारबाजी कायम राखताना 39व्या चेंडूवर आपले पहिलेवहिले आयपीएल शतक झळकवले. त्याने हेन्रिक क्लासनसह 57 धावांची अतिवेगवान भागी रचली. त्याने आपल्या 41 चेंडूंच्या खेळीत 8 षटकार आणि 9 चौकार लगावले. या भागीनंतर क्लासननेही 31 चेंडूंत 67 धावा फटकावताना 7 षटकार ठोकले. शेवटच्या 3 षटकांत 56 धावांचा पाऊस पाडताना अब्दुल समदने 10 चेंडूंत 3 षटकार आणि 4 चौकार मारताना 37 धावा काढल्या. एडन मार्करमनेही 32 धावा फटकावत हैदराबादला विक्रमी टप्पा गाठून दिला.

कार्तिकने वेड लावलं
दहा षटकांत 122 धावांत बंगळुरूचा अर्धा संघ गारद झाला होता. तेव्हा आलेल्या दिनेश कार्तिकने हैदराबादच्या गोलंदाजांना वेड लावताना चिन्नास्वामीवर हवाई हल्ले केले. त्याने महिपाल लोमरूरसह 25 चेंडूंत 59, तर अनुज रावतसह 28 चेंडूंत 63 धावांची भागी रचत बंगळुरूला विजयासमीप आणण्याची करामत केली. कार्तिकने आयपीएलमधील 108 मीटर सर्वात लांबीचा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. कार्तिकच्या षटकारांच्या वर्षावाने त्याला शतकाची संधी लाभली होती. पण तो 8 चेंडू आधी 83 धावांवर बाद झाला. अन्यथा त्याचे शतकही पूर्ण झाले असते आणि बंगळुरू 288 धावांच्या समीपही पोहोचला असता. कार्तिकने 7 षटकार आणि 5 चौकार ठोकत बंगळुरूच्या पराभवाचे दुःख काहीसे कमी केले.

विक्रमांचा पाऊस
हैदराबादने आयपीएलमधील सर्वाधिक 277 धावांचा विक्रम मोडताना 287 धावांचा नवा विक्रम रचला. तसेच आयपीएलच्या एका सामन्याच्या दोन्ही डावांत प्रथमच अडीचशेपेक्षा अधिक धावांचा विक्रम केला. बंगळुरूने 7 बाद 262 अशी मजल मारली. तसेच आयपीएलमध्ये एका सामन्यात 549 धावांचा नवा विक्रमही झाला.

– ट्रव्हिस हेडचे 39 चेंडूंत शतक, आयपीएलच्या इतिहासातील चौथे वेगवान शतक. याआधी ख्रिस गेल (30 चेंडू), युसूफ पठाण (37) आणि डेव्हिड मिलर (38) यांनी शतके झळकवली आहेत.

– आयपीएलच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक 21 षटकारांचा बंगळुरूचा षटकारांचा विक्रम मोडताना हैदराबादने 22 षटकार ठोकले. तसेच दुसऱया डावात 16 षटकार बंगळुरूने मारत एका सामन्यात सर्वाधिक 38 षटकारांचा नवा विक्रम प्रस्थापित केला.

– आयपीएलच्या इतिहासात चार गोलंदाजांना 50 पेक्षा अधिक ठोकण्याची पहिलीच वेळ. हैदराबादच्या फलंदाजांच्या झंझावातामुळे रीक टॉपली (68), यश दयाल (51), लॉकी फर्ग्युसन (52) आणि विजयकुमार वैशाख (64) यांनी आपल्या 4 षटकांच्या हप्त्यात 50 पेक्षा अधिक धावा मोजाव्या लागल्या.