‘अब की बार गोळीबार सरकार’, सुप्रिया सुळे यांचा भाजपवर निशाणा

लोकसभा निवडणुकीसाठी 400 पारचा नारा दिलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून याचाच प्रत्यय रविवारी पहाटे मुंबईकरांना आला. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार झाला. या घटनेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.

“ही घटना धक्कादायक आहे. त्या भागात सामान्यांसह प्रतिष्ठीत लोकंही राहतात. पहाटे दुधवाले, फेरीवालेही फिरत असतात. ज्येष्ठ नागरिक फिरायला जातात, मुलं शाळेत जातात, लोकं जॉगींगला जातात. अशी परिस्थितीत भर रस्त्यात गोळीबार होत असेल तर ‘अब की बार गोळीबार सरकार’ यावर शिक्कामोर्तब होतोय”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारपक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

“काही दिवसांपूर्वी पोलीस स्थानकामध्ये सत्तेत असणाऱ्या आमदाराने पोलीस स्थानकात गोळीबार केला. पोलीस स्थानकात गोळीबार करण्याची हिंमत होत असेल तर रस्त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतील लोकांना काही वाटणार नाही. कारण ‘अब की बार गोळीबार सरकार’ म्हणावे लागेल, आकडेवारीच याला पुरावा आहे”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; तीन राऊंड फायर, दुचाकीवर हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद

सुसंस्कृत पुण्यामध्ये कोयता गँग शब्दही माहिती नव्हता. आज कोयता गँग खुलेआम फिरते. त्याचा सोक्षमोक्ष का लावला जात नाही? हे लोण कॉलेजपर्यंत पोहोचले असून महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकारमध्ये याला कोणाचा तरी आशिर्वाद असावा, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. भाजपचे खासदार आम्हाला संविधान बदलायचं आहे, असं बोलले होते. एक प्रकारे त्यांच्या पोटातलं ओठावर आलं असून या सरकारला संविधान बदलायचं आहे त्यासाठी त्यांनी 400 पार ची घोषणा दिली आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.