सुरत: बेरोजगारी-महागाईनं त्रस्त तरुणानं केली टोमॅटोची चोरी; 150 रुपये प्रति किलोचा माल 40 रुपयांना विकला

tomato

देशात महागाईनं ग्राहकांचं कंबरडं मोडलं असून भाजीपाला महागल्यानं आता त्याची देखील चोरी होऊ लागली आहे. टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असतानाच सुरतमध्ये टोमॅटो चोरीची एक घटना उघडकीस आली आहे. या चोरीच्या घटनेची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांनी सूरतच्या कापोद्रा मार्केटमधून टोमॅटो चोरणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. टोमॅटोची चोरी करून त्या व्यक्तीने कवडीमोल भावाने टोमॅटोची विक्री केल्याचं समोर आलं आहे.

टोमॅटो चोरीची घटना कापोद्रा मार्केटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यानंतर हे संपूर्ण प्रकरण चांगलंच व्हायरल झालं होतं.

कापोद्रा भाजी मंडईत टोमॅटो चोरीच्या आरोपाखाली सुरत पोलिसांनी धनश्याम देवीपूजक नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, हा माणूस सहा महिन्यांपूर्वी सुरतला व्यवसायासाठी आला होता आणि कामाच्या शोधात भटकत होता. दरम्यान, त्यानं कापोद्रा भाजी मंडईतून 150 किलो टोमॅटो चोरला, मात्र ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या टोमॅटोची एकूण किंमत 17 हजार रुपये होती. टोमॅटोचे एकूण तीन क्रेट चोरल्याचं धनश्यामनं पोलिसांना सांगितलं आहे.

टोमॅटो का चोरले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घनश्यामनं चोरीच्या घटनेची कबुली दिली आहे. त्यानं सांगितले की तो बराच काळ बेरोजगार होता, म्हणून त्याने टोमॅटो चोरले आणि नंतर 40 रुपये किलोनं विकलं. घनश्यामनं सांगितले की, तो मूळचा गुजरातमधील भावनगरचा आहे. तो कामाच्या शोधात सुरतला आला, त्याला काम न मिळाल्यानं त्यानं टोमॅटोच्या वाढत्या किमती ऐकल्या आणि मग काही पैसे मिळावेत म्हणून टोमॅटो चोरण्याचा निर्णय घेतला.