अमित शहा राजीनामा द्या… संसदेच्या सुरक्षेवरून गदारोळ; लोकसभेच्या 14 तर राज्यसभेच्या एका खासदाराचे निलंबन

संसदेवर झालेल्या स्मोकबॉम्ब हल्ल्याचे तीव्र पडसाद आज दोन्ही सभागृहांत उमटले. या घटनेची जबाबदारी स्वीकारून गृह मंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा तसेच त्यांनी सभागृहात निवेदन सादर करावे, अशी मागणी करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. आक्रमक होत अनेक सदस्य वेलमध्य उतरले. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर सरकारचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला. दरम्यान, खासदारांवर अयोग्य वर्तनाचा ठपका ठेवत सभापतींनी कारवाईचा बडगा उगारला. लोकसभेच्या तब्बल 14 तर राज्यसभेच्या एका सदस्याला निलंबित करण्यात आले. ‘ही लोकशाहीची हत्या आहे’ अशी तोफ डागत काँग्रेससह विरोधी पक्षांनी या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला.

लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी लोकसभेतील घुसखोरीचा विषय मांडला. त्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. त्यामुळे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुरुवातीला कामकाज दुपारी 12 व त्यानंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केले. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने कामकाज दुपारी तीननंतर आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. सभागृहाचे कामकाज दोन वेळा व नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

भाजपने लोकशाहीची हत्या केली
दोन्ही सभागृहांत गदारोळ झाल्यामुळे तब्बल 15 खासदारांचे निलंबन करण्यात आले. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर ‘एक्स’वरून निशाणा साधला. भाजपा सरकारने लोकशाहीची हत्या केली, असा आरोप काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी केला आहे.

या प्रकरणाची जबाबदारी माझी
लोकसभेत बुधवारी झालेला घुसखोरीचा प्रकार हा अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे. या प्रकरणाची जबाबदारी ही माझी म्हणजेच लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाची आहे. त्यामुळे या घुसखोरीला जबाबदार असणाऱयांची शहानिशा करण्यात आली असून आठ कर्मचाऱयांना तातडीने निलंबित करण्यात येत असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाला दिली. तसेच प्रेक्षक गॅलरीचे पासेस तत्काळ बंद करण्याचे आदेशही लोकसभा अध्यक्षांनी दिले.

केंद्रीय मंत्री आणि खासदारांनाच केवळ मकरद्वारातून प्रवेश
नव्या संसदेचे मुख्य प्रवेशद्वार मानल्या जाणाऱया मकरद्वारातून आजपासून केवळ पेंद्रीय मंत्री व खासदारांनाच प्रवेश देण्यात आला. वरिष्ठ अधिकारी आणि संसदेतील कर्मचारी वर्गाला गरुडद्वारातून आत सोडण्यात आले. बुधवारच्या घटनेमुळे आज कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

ओ’ब्रायन यांची सातत्याने वेलमध्ये उतरून घोषणाबाजी
टीएमसी खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे सभापती जगदीप धनखड संतापले. तुम्ही विशेषाधिकाराचे उल्लंघन करत आहात. तुमचे वागणे पाहून माझी मान शरमेने झुकली आहे, अशा शब्दांत धनखड यांनी डेरेक यांना सुनावले.

भाजपला लोकशाही कळते का? – कनिमोळी
गॅलरीचे पास देणाऱया भाजप खासदार प्रताप सिंहांवर कारवाई व्हायला हवी. त्याऐवजी 15 खासदारांचे निलंबन केले. भ्रष्टाचार सिद्ध झाला नसताना मोईत्रा यांचे निलंबन केले. हे पाहता भाजपला लोकशाही कळते का? असा सवाल डीएमके खासदार कनिमोळी यांनी केला.

हल्ल्यामागचा मास्टरमाइंड फरारच
स्मोक बॉम्बहल्ल्याचा मास्टरमाइंड अद्याप फरारच आहे. ललित झा असे त्याचे नाव असून तो कोलकात्याचा राहणारा आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांतील अधिकाऱयाने दिली. सहा जणांनी ‘भगत सिंग फॅन पेज’ही फेसबुकवर तयार केले होते. पंतप्रधान मोदी बेपत्ता आहेत. त्यांना शोधून दाखवणाऱयांना स्वीस बँकेतून पैसे देण्यात येतील. असे लिहीलेली पत्रके आरोपींजवळ सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पंतप्रधानांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची बैठक
संसदेचे सुरक्षा कडे भेदून लोकसभेत स्मोक बॉम्बचा हल्ला झाल्यानंतर जगभरात हिंदुस्थानची नाचक्की झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पोहोचून पेंद्रीय मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पेंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि अनुराग ठाकूर उपस्थित होते.

केंद्राकडून चौकशीचे आदेश
या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसेच खासदारांनी प्रवेशाचे पास कुणालाही देताना सावधानता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.

पटियाला हाऊस न्यायालयाने चार जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी वेगवेगळय़ा ठिकाणचे आहेत. त्यामुळे त्यांना लखनौ, गुरुग्राम, म्हैसूरसह अनेक ठिकाणी न्यावे लागणार आहे. सर्व गोष्टींचा शोध घ्यावा लागेल. त्यामुळे त्यांना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चारही जणांना सात दिवसांची कोठडी दिली.

संसदेवरील हल्ला ही अराजकतेची सुरुवात
संसदेत घुसून अशा प्रकारचा हल्ला केला जात असेल तर याला कोणीही समर्थन देणार नाही. मात्र, देशात बेरोजगारांचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे संसदेतील हल्ला हा अराजकतेची सुरुवात आहे, अशी तोफ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डागली. यातील एक तरुण हा महाराष्ट्रातील तर एक तरुणी ही हरयाणातील आहे. ती तरुणी पीएचडीची विद्यार्थिनी होती. आता भाजपचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिला मार्गदर्शन करावे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. संसदेवर झालेल्या हल्ल्याचे समर्थन करता येणार नाही, परंतु देशातील तरुण बेरोजगारीमुळे संतप्त झाले आहेत, हे पाहणेही महत्त्वाचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

अमोल शिंदेला असिम सरोदे मदत करणार
अमोल शिंदे याला प्रख्यात वकील कायदेशीर मदत करणार आहेत. त्याने निवडलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी, असे मला वाटते. अमोलने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. परंतु मग संसदेतील लोक असे कोणते काम करत आहेत, ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल, असे मत सरोदे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मांडले आहे. कमजोर बेरोजगाराला खासदारांनी मारणे योग्य वाटत नाही. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात खासदार नापास झाले आहेत. अशा मारकुटय़ा खासदारांची इभ्रत काय राहिली? हे धनंजय शिंदे यांनी लिहिलेले विचार पटल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

त्या तरुणांची शिक्षा सरकारने माफ करावी
अकोला ः संसदेत घुसखोरी करणाऱया तरुणांनी सरकारी नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून हे कृत्य केले आहे. त्यामुळे या तरुणांना न्यायालयाने जरी शिक्षा ठोठावली तरी सरकारने मात्र या तरुणांची शिक्षा माफ करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यात केली. सरकार नोकऱया देऊ शकले नाही, त्यामुळे तरुणांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी कायदा मोडला हे बरोबर आहे, परंतु त्या तरुणांना शिक्षा द्यायची की माफी द्यायची हे सरकारने ठरवले पाहिजे. संसदेची सुरक्षा कमकुवत होती. उद्या आणखी काही घटना घडल्यास आश्चर्य वाटणार नाही, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.

भाजपने लोकशाहीची हत्या केली
दोन्ही सभागृहांत गदारोळ झाल्यामुळे तब्बल 15 खासदारांचे निलंबन करण्यात आले. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर ‘एक्स’वरून निशाणा साधला. भाजपा सरकारने लोकशाहीची हत्या केली, असा आरोप काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी केला आहे.

सभागृहात नसलेल्या खासदारावर कारवाई
निलंबन करण्यात आलेल्या खासदारांमध्ये लोकसभेत उपस्थित नसलेल्या खासदाराचेही नाव होते. प्रतिबन हे चेन्नईमध्ये होते. तरीही त्यांचे नाव निलंबित खासदारांमध्ये असा दावा काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी केला. हा मोठा विनोदच असल्याचा टोला त्यांनी लगावला.

विरोधी पक्ष राष्ट्रपतींना भेटणार
संसदेवरील स्मोक बॉम्बहल्ल्याप्रकरणी इंडिया आघाडीतील नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. आज गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रपतींकडे भेटीची वेळ मागण्याचा निर्णय घेण्यात आला. या मुद्दय़ावर दोन्ही सभागृहांत विरोधी पक्ष अमित शहा यांनी निवेदन करण्याची मागणी करणार आहेत.

या खासदारांचे निलंबन
सभागृहात अयोग्य वर्तन केल्याचा ठपका ठेवत सरकारने एकूण 15 खासदारांना निलंबित केले. लोकसभेचे खासदार टी. एन. प्रथापन, हिबी इडन, जोथिमनी, राम्या हरीदास आणि डीन कुरीयाकोसे यांना आधी निलंबित करण्यात आले. त्यानंतर काँग्रेसचे स्रीपंदन, मनिकम टागोर, बिनी बेहनाम, मोहम्मद जावेद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पी. आर. नटराजन, एस. वेंकटेशन, डीएमकेच्या कनीमोळी, सीपीआयचे के. सुब्बारावन, डीएमकेचे एस.आर. प्रतिबन आणि राज्यसभा खासदार डेरेक ओ’ब्रायन यांचे निलंबन करण्यात आले.

आठ सुरक्षा कर्मचारी निलंबित
नव्या संसद भवनाच्या सुरक्षेत कसूर केल्याप्रकरणी संसद सचिवालयाने आज गुरुवारी आठ सुरक्षा कर्मचाऱयांना निलंबित केले. सर्व कर्मचारी वेगवेगळय़ा सुरक्षा संस्थांचे असून त्यांना संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात करण्यात आले होते. रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमीत आणि नरेंद्र अशी या सुरक्षा कर्मचाऱयांची नावे आहेत. या घटनेनंतर संसदेच्या आत आणि बाहेर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली. गुरुवारी संसदेत जाणाऱयांचे शूज काढून तपासणी करण्यात आली. यावेळी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांना मकर गेटमधून इमारतीत प्रवेश देण्यात आला नाही. त्यांना शार्दुल गेटमधून संसदेत प्रवेश करावा लागला.

यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा
संसद हल्लाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पाचजणांना अटक केली असून ललित झा हा फरार आहे. संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी यूएपीएच्या कलम 16 आणि 18 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 म्हणजे दहशतवादी कृत्य आणि 18 म्हणजे कट रचणे या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गंभीर गुन्हा मानला जातो. या गुह्यांतर्गत कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त आजीवन कारावासाची शिक्षा दिली जाऊ शकते.अमोल शिंदे याच्यासह अन्य आरोपींना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले.

भाजप खासदाराला अभय
विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनानंतर काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. संसदेवरील हल्ला धक्कादायक होता. एकीकडे 15 खासदारांना निलंबित करण्यात आले तर दुसरीकडे दोन तरुणांना व्हिजिटर पास तयार करून दिल्याप्रकरणी भाजपाचे म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही याकडे वेणुगोपाल यांनी लक्ष वेधले आहे.