तेलंगणाच्या राज्यपाल टी. सौंदरराजन यांचा राजीनामा, भाजपकडून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता

तेलंगणाच्या राज्यपाल टी. सौंदरराजन (Tamilisai Soundararajan) यांनी राजीनामा दिला आहे. त्या भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. टी. सौंदरराजन यांच्याकडे पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल पदही होते. या पदाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

तेलंगणाच्या राज्यपालपदावर नियुक्ती होण्यापूर्वी टी. सौंदरराजन या तमिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. 2019 पर्यंत त्या या पदावर कार्यरत होत्या. सप्टेंबर 2019मध्ये त्यांची तेलंगणाच्या राज्यापालपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर किरण बेदी यांना हटवल्यानंतर त्यांच्याकडे पुडुचेरीच्या नायब राज्यपालाचा अतिरिक्त कारभारही सोपवण्यात आला होता. मात्र या दोन्ही पदांवरून त्यांनी राजीनाामा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने दक्षिणेकडील राज्यांमध्येही आपली ताकद आजमावण्याचे ठरवले आहे. भाजपने आतापर्यंत दोन याद्या प्रसिद्ध केल्या असून लवकरच तिसरी यादीही जाहीर होण्याची शक्यता आहे. या तिसऱ्या यादीत टी. सौंदरराजन यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे. ही यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच सोमवारी सकाळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामापत्र पाठवले.

काँग्रेसचे दिग्गज नेते कुमारी अनंतन यांची मुलगी टी. सौंदरराजन या गेल्या दोन दशकापासून भाजपमध्ये काम करत आहेत. राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्या तमिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. आता राज्यपालपदावर मुक्त झाल्यानंतर त्या तमिळनाडूतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. याआधी 2019 मध्ये त्या थुथूकुडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढल्या होत्या. मात्र त्या निवडणुकीत द्रमुकच्या कनिगोझी यांनी त्यांचा पराभव केला होता.