मुंबई पोलीस दलात शिपायांची दहा हजार पदे रिक्त, कामाचा ताण वाढला; आजारही वाढण्याची भीती

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित पोलीस शिपाई संवर्गाची तब्बल दहा हजार पदे रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. एकीकडे राज्यात निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि दुसरीकडे रिक्त पदे यामुळे पोलिसांवरील ताण वाढत आहे.

गृह खात्याकडील एका आकडेवारीनुसार बृहन्मुंबई पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची सुमारे 40 हजार 623 पदे मंजूर आहेत. त्यापैकी पोलीस शिपाई संवर्गाची सुमारे दहा हजार पदे रिक्त आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील उपलब्ध मनुष्यबळ हे सर्व प्रकारच्या दैनंदिन कामासाठी अपुरे पडत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस शिपायांची सुमारे 7 हजार 76 पदे आणि पोलीस चालकांची 994 पदे भरण्यात येणार आहेत. पण ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे गृह विभागाच्या एका प्रस्तावात नमूद केले आहे.

मुंबई पोलिसांवरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच अपुऱया मनुष्यबळामुळे सध्या पोलिसांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या बंदोबस्ताच्या कामासाठी सध्या पोलिसांना जुंपले आहे. पुढील काही दिवसांतच सणांचा मोसम सुरू होईल. त्या काळात बंदोबस्तात वाढ होईल. त्यापाठोपाठ पोलिसांवरील कामाचा ताणही वाढत जाणार आहे.  कामाच्या वाढत्या ताणामुळे पोलिसांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

पोलिसांना घरांचीही समस्या

मध्यंतरी समर्थ या स्वयंसेवी संस्थेने माहितीच्या अधिकारात मागवलेल्या तपाशिलातून पोलिसांच्या घरांविषयी धक्कादायक आकडेवारी पुढे आली होती. राज्यातील सुमारे 71 हजार पोलीस निवासस्थानापासून वंचित असल्याची आकडेवारी आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयातून समर्थनला मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस दलातील 24 हजार 996 पोलिसांना घरे उपलब्ध झाली आहेत. पण 77.82 टक्के पोलिसांना म्हणजे सुमारे 7 हजार पोलिसांना निवासस्थाची कमतरता असल्याची आकेडवारी आहे.

पाच वर्षांत मुंबईत सुमारे 821 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कामाचा अतिताण, पुरेशा झोपेचा अभाव अवेळी जेवण यामुळे पोलिसांमध्ये मधुमेह रक्तदाबाचे प्रमाणही अधिक आहे. पण कामाच्या ताणामुळे आरोग्य तपासणी करीत नाहीत. त्यामुळे 168 पोलिसांचा हृदयविकाराने, किडनीलिव्हरच्या विकाराने 77, मधुमेह उच्चरक्तदाबामुळे 46 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.