अभिनेत्याने लिंगबदल शस्त्रक्रिया केली; अभिनेत्री म्हणून काम मिळवण्याचा प्रयत्न

छोट्या पडद्यावरील एक अभिनेता काही वर्षांपूर्वी आपली लिंगबदल शस्त्रक्रिया करुन ‘ती’ बनला आहे. तिला आता अभिनय क्षेत्रात आपले स्थान निर्माण करायचे असून सध्या ती कामाच्या शोधात आहे. ही अभिनेत्री म्हणजे इवांका दास. लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी तिचे नाव अरणदीप दास असे होते. अरणदीप चा जन्म कोलकाता मध्ये झाला. त्याचे आई वडील दोघेही तो लहान असतानाच वारले. अरणदीपला लहानपणापासूनच त्याच्या शरिरातील बदल जाणवत होते. हळू हळू तो स्वत:ला स्त्री म्हणूनच ओळखू लागला होता.

अरणदीपने 2011 पासून आपल्या करियरला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने कोरिओग्राफर म्हणून काम केले. काही महिन्यांनी मॉडेल बनण्याचे स्वप्न घेऊन तो मुंबईला आला. मुंबईत आल्यावर त्याने डान्स इंडिया डान्स (2011) या रियालिटी शो मध्ये सहभागी झाला. यानंतर 2019 साली त्याने लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेनंतर त्याने स्वतःचे नाव बदलून इवांका दास असे केले.

इवंका दास एका मुलाखतीत म्हणाली की, मला वाटतय की अभिनय क्षेत्रात काम करुनही मला माझे हक्क मिळत नाहीयेत. मी गेल्या काही वर्षांत फक्त ट्रान्सवुमन म्हणून काम केले आहे. मी एका स्त्री प्रमाणेच दिसते तरीही लोकं मला स्त्री पात्राच्या भूमिकेत का घेत नाही, असा प्रश्न मला नेहमीच पडतो’. इवांकाने आर.बाल्की दिग्दर्शित ‘घूमर’ चित्रपटात ट्रान्सवुमन म्हणून काम केले. तसेच सध्या ती हिंदी टीव्ही शो “चांद जलने लगा” यात देखील काम करतेय.

इवांकाने तिच्या आजवरच्या प्रवासाबाबत बोलताना म्हटले की, “मी लहान असल्यापासून माझा असा विश्वास होता की माझे शरीर जरी पुरुषाचे असले तरी मी एक स्त्री आहे. सुरुवातीला अनेक वर्षे मी याबद्दल काही बोलले नाही, परंतु मला एक स्त्री म्हणून जगायचे होते. यामुळे 2019 मध्ये मी लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली. मला आशा आहे की भविष्यात मला एक असा जोडीदार मिळेल जो माझ्यावर खूप प्रेम करेल आणि मला मी जशी आहे तशी स्वीकारेल.