सौरभ गोखलेचा ‘नथुराम’ लवकरच रंगमंचावर

‘नथुराम’ विरुद्ध ‘नथुराम’ हा वाद अलीकडे निर्माण झाला होता. त्यानंतर आता ओरिजनल ‘मी नथुराम गोडसे’ नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर येत आहे. या नाटकात नथुरामची भूमिका अभिनेता सौरभ गोखले साकारणार आहे. माऊली प्रॉडक्शन्सचे उदय धुरत यांनी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या वादग्रस्त नाटकाचे 817 प्रयोग केले. नाटकाचे लेखन ज्येष्ठ नाटककार दिवंगत प्रदीप दळवी यांनी, तर दिग्दर्शन विनय आपटे यांनी केले. मध्यंतरीच्या काळात माऊली प्रॉडक्शन्सने नाटक काही कारणास्तव थांबवले. मात्र पुन्हा एकदा माऊली प्रॉडक्शन्सच्या या नाटकाचा 818 वा प्रयोग रंगभूमीवर सादर होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. नाटकाचे पुनर्दिग्दर्शन विवेक आपटे करीत आहेत. नाटकात आकाश भडसावळे, चिन्मय पाटसकर, सुजित देशपांडे, तेजस बर्वे, स्वप्नील फडके, अमित जांभेकर, समर्थ कुलकर्णी, गौरव निमकर यांच्या भूमिका असून नाटकाच्या तालमी सुरू आहेत. नव्या तंत्रांसह नव्या ढंगात वेगळ्या धाटणीचा प्रयोग सादर होईल.