महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागतील

prithviraj-chavan

‘महाराष्ट्रातील वातावरण मोदींविरोधात आहे. लोकसभेची ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली असून, महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनपेक्षित निकाल लागतील,’ असा विश्वास काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ‘सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे मोठय़ा मताधिक्याने विजयी होतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे सातारा मतदारसंघातील उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘सातारा लोकसभा मतदारसंघाने जातीयवादी विचारांना कधीही थारा दिलेला नाही. त्याचप्रमाणे पक्ष सोडून गेलेल्यांचा या जिह्याने पराभव केला आहे. यावेळीही या मतदारसंघाची उज्ज्वल परंपरा कायम राहील,’ असे ते म्हणाले.

चव्हाण म्हणाले, ‘मागील निवडणुकीत नऊ मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपला फायदा झाला. समतावाद्यांचे नेतृत्व करण्याची संधी ऍड. प्रकाश आंबेडकरांना होती. मात्र, त्यांनी ती गमावली आहे. त्यांनी आमच्यासोबत यावे, ही आमची इच्छा आहे.’

ईव्हीएमवर जनतेचा विश्वास नाही

‘ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी काँग्रेसने वेळोवेळी केली होती. आता देशातील जनताही ईव्हीएम मशीनवर विश्वास नसल्याचे सांगत आहे,’ असेही चव्हाण म्हणाले.

मतविभागणी टाळण्यासाठी एकत्र

‘भाजपकडे देशात केवळ 30 टक्के मते आहेत. उर्वरित 70 टक्के मते ही काँग्रेस आणि इतर पक्षांकडे आहेत. त्यामुळे या मतांची विभागणी होऊ नये, यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसेल,’ असे चव्हाण म्हणाले.

व्यक्तिस्तोम माजविण्याचा प्रकार

‘‘मोदींची गॅरंटी’ असे म्हणत व्यक्तिस्तोम माजविण्याचाप्रकार सुरू आहे. रशिया, चीन या देशांमध्ये जे घडले, तेच या देशातही घडविण्यासाठी मोदींकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या हातात सत्ता गेल्यास संविधान बदलण्याचा प्रयत्न होईल. त्यांना संविधानात आमूलाग्र बदल घडवायचा आहे, तसेच संविधानाचा आत्मा काढून ढाँचा तसाच ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत,’ असा हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.