त्यानं डेटसाठी विचारलं अन् आता त्याचं केळवणात रुपांतर झालं; अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली, लग्नही ठरलं

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि ‘दृश्यम-2’ या बॉलिवूडपटामध्ये झळकलेला अभिनेता सिद्धार्थ बोडके लग्नबंधनात अडकणार आहेत. तितीक्षा तावडे हिने स्वत: चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. तितीक्षाने सिद्धार्थसोबतचा एक फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.

तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या केळवणाचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये तितीक्षाने ऑफ व्हाईट रंगाची काठापदराची साडी आणि सिद्धार्थ पांढऱ्या रंगाचा सदरा घातला आहे. ‘त्याने (सिद्धार्थ) मला डेटसाठी विचारले आणि आता त्याचे केळवणात रुपांतर झाले आहे’, असे कॅप्शन या फोटोला तितीक्षाने दिले आहे.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तितीक्षा-सिद्धार्थ या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दीपा चौधरी, गौरव मोरे, स्पृहा जोशी, ऋतुजा बागवे, गौतमी देशपांडे, अक्षया नाईक, सुरुची अडारकर, सुयश टिळक, भक्ती देसाई, ऐश्वर्या नारकर या सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या वर्षी तितीक्षाने आपल्या वाढदिवसाला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील खास व्यक्तीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले होते. तितीक्षासोबत या फोटोमध्ये ‘दृश्यम-2’ मध्ये झळकलेला सिद्धार्थ बोडके दिसला होता. याआधीही दोघांनी एकमेकांसोबत फोटो शेअर केले होते. तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी शिजतंय याचा वास नेटकऱ्यांना आला होता. आता दोघांनी प्रेमाची कबुली देत थेट लग्नाचा बार उडवून देण्याचे ठरवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

दरम्यान, तितीक्षा आणि सिद्धार्थ छोट्या पडद्यावरील ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र दिसले होते. त्यानंतर तितीक्षाने ‘असे हे कन्यादान’, ‘तू अशी जवळी रहा’, ‘सरस्वती’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले. सध्या ती ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेमध्ये नेत्रा हे पात्र साकारत आहेत. तर सिद्धार्थ बोडके ‘दृश्यम-2’ या बॉलिवूडपटात आणि ‘श्रीदेवी प्रसन्न’ या मराठी चित्रपटामध्ये झळकला होता.