तृप्ती देवरूखकर प्रकरण: राज्य महिला आयोगाच्या दणक्यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये

मुंबईच्या मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला सोसायटीने ऑफिस देण्यास नकार दिला. तसेच या महिलेशी सोसायटीच्या सदस्यांनी गैरवर्तन केले. सोशल मीडियाचा आधार घेत श्रीमती देवरुखकर यांनी आपली व्यथा सगळ्यांसमोर मांडली. हे वृत्तवाऱ्याच्या वेगानं पसरल्यानंतर संतापाची लाट उसळली. राज्य महिला आयोगानंही याची दखल घेत कारवाईचे निर्देश दिले.

श्रीमती देवरुखकर यांचा तो व्हिडीओ रुपाली चाकणकरांनी पाहिल्यानंतर त्यांनी आयोगामार्फत तात्काळ कारवाईचे निर्देश दिले होते. याप्रकरणी सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून अहवाल मागण्यात आला आहे. सोबतच मुलुंड पोलिसांना याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

आयोगाच्या सूचनेनुसार काल रात्री उशिरा मुलुंड मध्ये पोलिसांनी देवरुखकर यांना त्रास देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संविधानाने दिलेला हक्क नाकारणे, महिलेचा छळ करणे या अनुषंगाने दोषींवर कारवाई व्हावी होईल. याबाबत देवरुखकर यांना न्याय मिळेपर्यंत आयोग पाठपुरावा करेल, असंही चाकणकर यांनी सांगितलं आहे.