ट्रकचालक संपामुळे राज्यात अभूतपूर्व स्थिती, संजय राऊत यांनी सरकारला दिला महत्त्वाचा सल्ला

ट्रकचालकांचा संप सुरु आहे. त्याचा सर्व जीवनावश्यक पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे. राज्यामध्ये गोंधळाची स्थिती आहे. ट्रकचालक रस्त्यावर उतरले, पोलिसांवर हल्ले झाले. याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारला महत्वाचा सल्ला दिला. ते म्हणाले, राज्य सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे आणि केंद्राकडे यांसंदर्भात जाऊन चर्चा करणे गरजेचे आहे. हिट अॅण्ड रन हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. त्याच्याशी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण जी परिस्थिती राज्यामध्ये उद्भवली आहे ती अभूतपूर्व आहे. हे प्रकरण चिघळत गेलं तर सामान्य माणसाला त्याचा त्रास सहन करावा लागले. महाराष्ट्रात वाहन चालक रस्त्यावर उतरले आहे, आंदोलन करत आहेत. पेट्रोलपंपवर गोंधळाची परिस्थिती आहे. गर्दी आहे. ट्रक बंद आहेत. आपल्या राज्यात पाण्यापासून दूध, भाजी, धान्य सगळ्याच्या वितरणावर परिणाम झाला आहे. राज्यसरकार आणि केंद्र सरकारने याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे असाही सल्ला संजय राऊत यांनी यावेळी दिला.

महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भात काँग्रेसची वेगळी भूमिका असून त्यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार आहेत असं तुम्हाला कुणी सांगितलं? काँग्रेसचे वरीष्ठ नेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याशी उद्धव ठाकरेंचा चांगला संवाद आहे. एकूण महाआघाडीमध्ये चांगला संवाद आहे. जवळजवळ जागावाटपाचा प्रश्न आहे त्यात कोणतीच अडचण दिसत नाही आणि भविष्यामध्य़े आम्हाला गरज पडली तर नक्कीच आम्ही दिल्लीत जाऊ. जर काँग्रेसचा जागावाटपविषयी काही विषय असेल तर तो आम्ही दिल्लीत बसून सोडवू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

पुढे संजय राऊत म्हणाले, “सुप्रिया सुळेंनी जर सांगितलंय की महाविकास आघाडीत जागावाटपावर कोणतेही मतभेद नाहीत आणि लवकरच यासंदर्भात घोषणा होईल, ही चांगली गोष्ट आहे. मी त्याचं स्वागत करतो. आम्ही सगळे एक आहोत. आमची वज्रमूठ ही महाविकास आघाडीची ताकद आहे. एक दोन जागांवरुन आम्ही महाआघाडीत तणाव निर्माण करणार नाही.

भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक पक्ष बदलले आहेत. ते शिवसेनेत होते, काँग्रेसमध्ये होते आता भाजपमध्ये आहेत. असे जे नेते असतात त्यांना पक्षांतराविषयी फार चाण नसते. ते अशाप्रकारची वक्तव्य करत असतात. त्यांचे अख्खे आयुष्य काँग्रेस पक्षात गेलेले आहे. आधी शिवसेनेत आले मग भाजपमध्ये गेले. त्यांच्यावरती काय बोलणार. कोण जातयं कोण राहतय हा येणारा काळ ठरवेल आणि उद्या सत्ता नसेल भाजपकडे तर आपण कुठे असणार आहात हाही विचार करुन ठेवा असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूकीचा प्रचार दक्षिणेत संख्याबळ कमी असल्यांमुळे तिकडून करणार आहेत. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले , पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याकडे सर्व साधने आहेत. त्यांनी दक्षिणेकडूनच काय त्यांनी दक्षिणधृवावरुन, अगदी चंद्रावर सोडलेल्या यानावरुन जरी प्रचार केला तरी त्यांना कोण अडवणार आहे? ते काहीही करु शकतात. अमर्याद सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे. यंत्रणा आणि साधना देखील आहेत. त्यामुळे ते वर जे चांद्रयान गेले आहे किंवा दक्षिणध्रुव आहे तिथूनसुद्धा प्रचार करु शकतात. कुठुनही प्रचार करु शकतात असा हल्लाबोल केला.