बांधकामाचे साहित्य चोरणार्‍या दोन सराईत गुन्हेगाराला अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना जिल्ह्यात शहरात व ग्रामीण भागात बांधकामाचे साहित्य चोरी करणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी जेरबंद करुन त्यांच्या ताब्यातून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून ही कारवाई आज 8 ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यातील बांधकामाचे साहित्य चोरी करणारे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्यावरुन पोलीस निरीक्षक खनाळ यांनी वेगळे पथक तयार करुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदरील गुन्हे उघडकीस आणण्या करिता बारकाईने सुचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगारांची माहीत घेत असताना बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, पोलीस ठाणे तालुका जालना, सदर बाजार व चंदनझिरा हद्दीतील झालेले बांधकाम साहित्य चोरी बाबतचे गुन्हे सचिनसिंग बहामसिंग कलाणी रा. गुरुगोविंदसिंग नगर, जालना याने त्याचे साथीदारासह केले असल्याची माहिती मिळाली.

या आरोपीचा शोध घेत असतांना सचिनसिंग बहामसिंग कलाणी या आरोपीस ताब्यात घेऊन बारकाईने गुन्ह्याबाबत व त्याचे इतर साथीदारा बाबत माहीती विचारली असता त्याने त्याचे साथीदार ज्वालासिंग रामसिंग कलाणी व इतर दोन फरार आरोपी सर्व रा. गुरुगोविंदसिंगनगर, जालना यांनी मिळुन केल्याचे मान्य केले. त्यामुळे शहरातील व ग्रामिण भागातील वेगवेगळ्या ठिकाणी बांधकामाचे साहित्य ज्यात विद्युत वाहनीचे लोखंडी मनोर्‍याचे साहित्य, लोखंडी सळ्या, जॅक पाईप, लोखंडी प्लेट असा एकुण 1 लाख 63 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल या आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आला असून 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. दोन आरोपीतांना जप्त मुद्देमालासह पोलीस ठाणे तालुका जालना येथे हजर करण्यात आले आहे पुढील तपास तालुका जालना, सदर बाजार, चंदनझिरा पोलीस हे करीत आहेत.