कर्नाटक – बोअरवेलमध्ये पडलेल्या 18 महिन्यांच्या चिमुरड्याची 20 तासांनी सुखरुप सुटका

कर्नाटकमधील विजयपुरा जिल्ह्यातील इंडी तालुक्यात येणाऱ्या लचायन या गावामध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षांच्या चिमुरड्याची 20 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

बुधवारी सायंकाळी सात्विक नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. त्यानंतर पोलीस, स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले होते. या बचावकार्याला गुरुवारी दुपारच्या सुमारास यश मिळाले आणि मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कुटुंबियांनी सह बचावकार्यात सहभागींनी सुटकेचा निश्वास सोडला.

बुधवारी सायंकाळी खेळताखेळता हा मुलगा 16 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. बराच वेळ मुलगा दिसला नाही म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. मात्र घराजवळ कुठेही तो आढळला नाही. अखेर रडण्याचा आवाज येऊ लागल्याने तो बोअरवेलमध्ये पडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने पोलिसांना ही माहिती कळवली. पोलीस आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत ऑपरेशन सुरू केले. त्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफनेही घटनास्थळी धाव घेतल्याने बचावकार्याला वेग आला.

मुलाला सुखरुप बाहेर काढण्यासाठी बोअरवेलच्या आजूबाजूने 21 फुटांपर्यंत खड्डा खोदण्यात आला. त्यानंतर जवानांनी त्याला सुखरुप बाहेर काढले. घटनास्थळावर उपस्थित डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले असून त्याला तपासणीसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.