बस हुई महंगाई की मार! अब क्यो चाहिए मोदी सरकार!! महाविकास आघाडी लढाईसाठी सज्ज बैठकीत निवडणूक प्रचारावर चर्चा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण व अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गुरुवारी ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. आगामी निवडणुकीत कोणत्या मुद्दय़ांवर प्रचार व्हावा, एकत्र प्रचार कसा करायचा, लोकांपर्यंत कसे पोहोचायचे यावर या बैठकीत चर्चा झाली.

महाविकास आघाडी लोकसभेच्या लढाईसाठी सज्ज झाली आहे. आजच्या बैठकीत प्रचाराचे सूत्र ठरवण्यात आले. विविध प्रभावी घोषणांबाबतही विचारविनिमय झाला. बैठकीला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड बैठकीला उपस्थित होते. महाविकास आघाडीचे इलेक्शन पॅम्पेन पॉझिटिव्ह असावे तसेच पुढच्या दीड-दोन महिन्यांतील प्रचार आणि घोषणा कशा असाव्यात यावर आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे आव्हाड यांनी सांगितले. यावेळी सादरीकरणही करण्यात आल्याचे ते म्हणाले.

आघाडी म्हटली की कुणीतरी नाराज असतोच

मतदारसंघांवरून आघाडीत मतभेद झाले असल्याचा प्रश्न यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी आव्हाड यांना विचारला. त्यावर आघाडी म्हटली की मतभेद असतात, कोणीतरी नाराज हे होतंच. पण शेवटी मन एकत्र करून पुढं जायचं असतं असे सांगतानाच, आजची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात झाल्याचे आव्हाड म्हणाले.

वॉशिंग मशीन है भाई…चलता है

प्रफुल्ल पटेल हे पेंद्रीय नागरी उड्डाणमंत्री असताना त्यांनी केलेल्या विमाने खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होता. त्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सुरू असलेला सीबीआय तपास आज थांबवण्यात आला. त्यासंदर्भातही माध्यमांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला.  त्यावर ‘बीजेपी मे शामील हो जाओ, व्हाईट होके वापस आओ, चलता है भाई… वॉशिंग मशीन है ना.’ असे मिश्कील उत्तर आव्हाड यांनी दिले.

गोविंदा हा बाजूला केलेला माल

अभिनेता गोविंदा मिंधे गटात गेल्याच्या प्रश्नावर आव्हाड म्हणाले, ‘गोविंदा ज्यावेळी सुपरहिट होता तेव्हा तो आमच्याकडे होता. आता तो बाजूला केलेला माल आहे. त्यामुळे आता तो कुठेही जाऊद्या. आम्हाला काय करायचेय.’

प्रकाश आंबेडकरांचे स्वागतच आहे

प्रकाश आंबेडकरांनी बैठकीला न बोलावल्याचा आरोप केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना आव्हाड म्हणाले, ‘प्रकाश आंबेडकरांचे महाविकास आघाडीत स्वागतच आहे. आम्ही अजून त्यांना बोलवतोय. आपण एकत्र बसून चर्चा करूया, मार्ग काढूया असे आम्ही म्हणतोय. तसेच संविधानाच्या विरोधात काम करणाऱयांना लोकांना फायदा होईल असे काम आपण केले तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. आंबेडकर हे खूप मोठे माणूस आहेत. बैठकीला छोटे छोटे लोक असतात, त्यांची उंची खूप मोठी आहे. शिवाय बैठकीत काय घडले हे सर्व त्यांना आम्ही फोनवरून सांगत असतो. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही. राष्ट्रहितासाठी एकत्र यायला पाहिजे, संविधानविरोधी लोकांविरोधात लढायला पाहिजे,’ असे आव्हाड म्हणाले.

महाराष्ट्रातील गद्दारीचा मुद्दा प्रचारात उठणार

निवडणुकीत ‘बस हुई महंगाई की मार, अब क्यो चाहिए मोदी सरकार’ अशा घोषणा तयार करण्यावर चर्चा झाल्याचेही आव्हाड यांनी पुढे सांगितले. महाराष्ट्रात गद्दारी कशी झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीत खंजीर कसे खुपसले गेले हे मुद्दे प्रचारात कसे आणायचे यावरही चर्चा झाल्याचे ते म्हणाले.