लोकांच्या घरादारावर नांगर आणि समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिला; उद्धव ठाकरेंचा निशाणा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी सोमवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकरांच्या प्रश्नांना उत्तर देताना विविध मुद्द्यांना हात घातला. मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासीन आहेत, असं म्हणतानाच ‘लोकांच्या घरादारावर नांगर आणि समुद्रावर ट्रक्टर चालवणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदाच पाहिला’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे सगळ्यात पहिले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले. ‘शेतकऱ्यांवर एक दीड वर्षात जी काही संकंट कोसळत आहेत, नुकतीच ही गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला त्याच्याबाबतीत सरकारनं काय केलं आहे? काय करू शकतंय? विमा कंपन्या यांनी दरवाजे खिडक्या बंद केल्या आहेत. या सरकारने जाहीर केलं होतं की दिवाळीपर्यंत विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना देऊ, ती किती शेतकऱ्यांना दिली याचीही काही अंदाज नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंगोलीतील शेतकऱ्यांचा ‘मातोश्री’वरील भेटीचा अनुभव देखील त्यांनी यावेळी सांगितला. ‘शेतकऱ्यांची हालाकीची परिस्थिती आहे. कर्जाचा डोंगर उभा आहे, कर्ज वसुलीसाठी बँकाचा तगादा मागे लागलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांचा वालीच कुणी नाही. ना सरकार ना विमा कंपन्या कुणीच दखल घेत नाही, म्हणून हे शेतकरी त्यांचे अवयव विकायला आले होते. अशी परिस्थिती याआधी कधी आली होती असं आठवत नाही’, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

आपल्यावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी यावेळी पलटवार केला. ‘लोकांच्या घरादारावर नांगर आणि समुद्रावर ट्रक्टर चालवणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदाच पाहिला’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदारांना बोलू दिलं जात नसल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासिन आहेत. माझ्यावर आरोप करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबत आपण काय करतो आहोत? हे स्पष्ट करावं असं उद्धव ठाकरे म्हणाले. पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पावणे दोन कोटींच्या घरात आहे. मग आठ हजार कोटी रुपये हा शेतकऱ्यांचा हिस्सा तो राज्य सरकारने भरला. हा जनतेचा पैसा आहे. या पैशांचं पुढे काय झालं? की हा पैसा त्यांच्या मित्रांच्या खिशात गेला? त्याचं उत्तर सरकारनं द्यायला पाहिजे’, अशी मागणी त्यांनी घेतली.

‘सरकारचे आमदार, पदाधिकारी, समर्थक यांच्याकडून गुंडागर्दी सुरू आहे. कोल्हापुरात काल परवाकडे घरात घुसून गुडांनी मारहाण केली पण त्यांच्यावर कारवाई होणार की नाही? हा विषय आहे’, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. ‘आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे की देव-धर्माच्या नावावर मत मागण्याची परवानगी असेल तर आम्ही देखील ते सुरू करतो’, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

नबाब मलिक-प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. ‘ज्या न्यायाने नबाब मलिकांना तुम्ही दूर ठेवा असं सागितलं मग तोच न्याय दुसऱ्याला लावणार आहात की नाही? एकाला एक न्याय दुसऱ्याला वेगळा न्याय असं लोकांना पटेल का? नबाब मलिकांना जो न्याय लावला तोच प्रफुल्ल पटेलांना देखील लावणार की नाही’ या पत्राच्या उत्तराची देखील वाट पाहात असल्याचं त्यांनी सांगितलं.

जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं योग्य ठरवलं आहे. यावर देखील उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी केंद्र सरकारकडून अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागतच करतो. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला शिवसेनेचाही पाठिंबा होता. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे की 2024 च्या सप्टेंबर महिन्याच्या आत सार्वत्रिक निवडणुका घ्या. तशा मोकळ्या वातावरणात निवडणुका होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसंच देशभरात पंतप्रधान गॅरंटी घेत आहेत. तर कश्मीरी पंडित कश्मिरात परतील आणि विधानसभा निवडणुकीत मतदान करतील अशी गॅरंटी मोदींनी घ्यावी’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कश्मीरची निवडणूक घ्यायचीच आहे, घ्यावीच लागले तर पाक-व्याप्त कश्मीर घ्या, म्हणजे अख्ख्या कश्मीरची निवडणूक एकदमच घ्यावी लागेल, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.