तुमच्यापेक्षा ठाकरे घराण्याला महाराष्ट्र जास्त ओळखतो, मांडा 7 पिढ्यांचा इतिहास! उद्धव ठाकरेंचं मोदी-शहांना आव्हान

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा झंझावात हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेडमध्येही पाहायला मिळाला. उमरखेडमध्ये उद्धव ठाकरे यांची तुफानी जनसंवाद सभा झाली. या सभेसाठी भर उन्हात भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी, शहांचा समाचार घेतला. तुमच्या सात पिढ्यांचा इतिहास मांडा आणि माझ्या कुटुंबाचाही मांडतो. बघू महाराष्ट्रातील जनता कोणाला अधिक ओळखते? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी  मोदी, शहांच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला.

पक्ष फोडलाय पक्ष चोरलाय, धनुष्यबाण… ही आपली निशाणी चोरली आहे. तरीही जिथे जातोय तिथे गर्दीच गर्दी उसळतेय. हे बघितल्यावर त्यांच्या पोटात आणखी दुखतंय. त्यामुळे आणखी गर्दी वाढतेय आणि त्यांच्या पोटात पुन्हा दुखतंय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी गद्दारांवर तोफ डागली. नवीन समीकरण झाल्यानंतर ही आपली पहिली निवडणूक आहे. हे समीकरण का झालं, कसं झालं? हा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आपण सरकार चालवून दाखवलं. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, 10 रुपयांत शिवभोजन, आपत्ती काळातील मदत केली आणि कोविडचं संकट होतं. त्याही काळात देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून नाव माझं येत होतं, पण काम तुमचं होतं. जनतेच्या सहकार्यामुळेच ते होऊ शकलं. प्रशासन आपण चालवू शकतो हे महाविकास आघाडीने दाखवलेलं आहे. आता निवडणूक कशी विरोधकांची डिपॉझिट जप्त करून जिंकून दाखवू शकतो, त्याची ही पहिली निवडणूक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकसभा निवडणूक आता तोंडावर आल्या आहेत. याच क्षणाची आपण वाट पाहत होतो. गद्दार येऊन आता जवळपास दोन एक वर्ष झाले. मी दोन वर्षात आलो नाही. दोन वर्ष जाऊ द्या. आपल्यापेक्षा कर्तबगार असतील तर, हे गद्दार आपली कर्तबगारी जगाला दाखवतील. जे माझ्यावर आरोप करतो. घरी बसून राहिले. घरी बसून असतो तर एवढ्या मोठ्या संख्येने लोक माझ्यासोबत आले असते का? तुम्ही आज दारो दारी फिरताय. नुसतं सरकार आपल्या दारी, असं नाहीये. हे मिंधे तिकडे भाजपच्या दारी कटोरं घेऊन जातयेत रोज. ते सांगतात उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं. तसा करणाऱ्यातला मी नाही आणि नव्हतो. त्यांना कठपुतलीचा खेळ पाहिजे. आपण यांच्या हातातले बाहुले नव्हतो. म्हणूनच आपल्यातल्याच काही लोकांना गद्दारी करून 50 खोके दिले. तिथून सुरुवात झाली. आपण काय दिलं नव्हतं गद्दारांना?, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी मिंध्यांवर टीका केली.

इथला खासदार कोण होता? कशी त्याची भरभराट झाली? हळदीचा प्रक्रिया प्रकल्पही मुख्यमंत्री म्हणून मी मंजूर केला होता. प्रकल्प दिला आणि हळद लावून तिकडे बोहल्यावर चढले. सगळं दिलं. खासदारकी दिली आमदारकी दिली. मिंधेला महत्त्वाचं खातं दिलं होतं. काहींची भूक अशी असते, त्याला भस्म्या रोग म्हणतात. कितीही खाल्लं तरी भूकच भागत नाही. काहींची अशी असते, एवढं खातात की अजीर्ण होतं. आता जे गद्दार गेले ते काहींची भूक शमत नाही म्हणून गेलेत. आणि काहीजण खाऊ खाऊन अजीर्ण झालं म्हणून त्यावर उपचार करण्यासाठी गेलेत. खाल्लंय आम्ही, आता आम्हाला शिक्षा वैगरे नको. तुमचे पाय धुतो, बुट चाटतो, अशी वेळ आलीय. कोण आहे ते? राहुल गांधींनी परवा नाव घेऊन सांगितलं त्यांचं नाव. तुम्ही ओळखलं असेल कोण नेता तो. सोनियांकडे गेले म्हणले काय करू मी, एवढं खाल्लंय आता तुरुंगात जावं लागेल. आता मी तुरुंगात जाऊ शकत नाही. आणि यालाच म्हणतात हुकूमशाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

हे सगळं ईडी, सीबीय आणि इन्कम टॅक्स मागे लावून एक तर तुरुंगात जा नाहीतर भाजप किंवा मिंधेकडे, असं धमकावलं जातंय. एखादा असा संजय राऊत असतो. अरे तुमच्यात हिंमत असेल तर टाका किती दिवस तुरुंगात टाकताय, असं म्हणणारा. याला म्हणतात निष्ठा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचं कौतुक केलं.

खास करून हिंगोलीकरांचं अभिनंदन करायचं आहे. इथेही गद्दारी आणि बेईमानी झाली आहे. ज्यांनी बेईमानी केली त्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का लागला. मात्र हिंगोलीकरांनी निष्ठेचा शिक्का कधी सोडला नाही. शिवसेना देईल तो उमेदवारी तुम्ही भक्तीभावाने निवडून देत आला. आताही तेच मला पाहिजे. नवीन समीकरणात कोणाकडे किती जागा? हा चर्चेचा विषय काही दिवसांत सुटेल. महत्त्वाचं म्हणजे आपण सगळे लढतोय ते तुझं-माझं नाही तर देशातली हुकूमशाही गाडून टाकायची आहे, म्हणून आपण एकत्र आलो आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना आवाहन केलं.

अमित शहा सांगात, उद्धव ठाकरेंसोबत असं काही ठरलंच नव्हतं. अडीच-अडीच वर्षे असं काही वचन दिलंच नव्हतं. मी माझ्या आई-वडिलांची शपध घेतली. तुळजाभवानी मातेची शपथ घेतली. खरं कोण आणि खोटं कोण ठरवायला आणखी एक उदाहरण सांगतो. 2014 पासून मोदी सांगतायेत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. मग उत्पन्न दुप्पट झालं, नाही? पीकविमा योजना. विम्याचे पैसे मिळतायेत, नाही. मग स्त्रीधन, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जनधन योजनेचा लाभ मिळाला का? नाही. मग खोटं कोण बोलतंय? भाजप की मी? जो पक्ष माझ्या 140 कोटी जनतेशी अगदी दिवसाढवळ्या खोटं बोलू शकतो, आता त्यांचाच माणूस अमित शहा हे मला आता खोटं ठरवतायेत. अमित शहांना एकच सांगतो, तुमच्यापेक्षा ठाकरे कुटुंबीयांना आणि ठाकरे घराण्याला हा महाराष्ट्र जास्त ओळखतो. तुमच्या घराण्याचा सात पिढ्यांचा इतिहास मांडा. अमित शहांच्या आणि मोदीजींच्या सात पिढ्यांचा इतिहास मांडा. आणि उद्धव ठाकरेच्या सात पिढ्यांचा इतिहास मांडा आणि विचारा जनतेत? असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.

परवा देवेंद्र फडणवीसांची मुलाखत आली, तुम्ही पाहिली? उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले म्हणून आम्ही भाजपच्या नादी लागलो, हे मिंधे सांगतायेत. पण देवेंद्र फडणवीस स्वतः बोललेत की, मी बोलल होतो पुन्हा यईन. मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलेलो आहे. म्हणजे किती नालायक वृत्तीची लोक आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मेघा इन्फ्रस्ट्रक्चर कंपनीचा अचानक उदय कसा झाला? या कंपनीला सरकारी कामाची टेंडर देण्याच्या तारखा आणि निवडणूक रोखे त्यांनी भाजपला देण्याच्या तारखा या जवळपास एकच आहेत. या नांदेड परिसरात त्यांना हजारो एकर जमीन दिली गेली, असं सांगतात. मुंबईतही मुंबई महापालिकेवर प्रशासक आल्यानंतर पालिकेची कामं, मेट्रोची कामं मिळाली. सगळी उधळपट्टी होतेय. आम्हालाही निवडणूक रोखे मिळाले. आम्ही रोखे जाहीर करू. आम्हाला मिळालेले रोखे हे ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स किंवा कॉन्ट्रॅक्टच्या बदल्यात आम्ही घेतलेत, हे दाखवून द्या. असं एकही सापडणार नाही. सत्तेची हाव आणि ही तुमची ही जुलुम जबरदस्ती सुरू आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोना काळात महाराष्ट्र अगदी तळहाताच्या फोडा प्रमाणे जपला. सगळं काही बंद होतं. शेतीची कामं सुरू होतं. त्याच काळात भाजप मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार पाडत होतं. कमलनाथ मुख्यमंत्री होते. काँग्रेसचं सरकार पाडलं, शिवराजसिंह चौहान यांना बसवलं आणि त्यानंतर त्यांनी तिकडे लॉकडाउन केला. किती विकृत माणसं आहेत. जनता मरतेय, लोकांचे प्राण जातयेत. माणसं मरतायेत मरू दे, आमचं सरकार बसेल त्यानंतर आम्ही इलाज सुरू करू. एवढं निर्दयी सरकार हे 10 वर्षे आपण बघितल्यानंतर यांनी लाजलज्जा सोडलेली दिसतेय. सर्व कारभार उघडा पडलेला असताना निवडणूक रोख्यांमध्ये, कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली तुम्ही पैसे खातायेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

उत्तर भारतात शेतकरी आंदोलन करत आहेत. त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यावाह दत्तात्रय होसबळे यांनी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली अराजकता, असं म्हटलं आहे. त्याची बातमी आली आहे. हमी भाव देणार नाही, कर्जमाफ करणार नाही, आयात-निर्याण धोरण आम्ही आमच्या मर्जीने ठरवू, उद्योगपती सांगतील तसं ठरवू, जर तुम्ही आपल्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरलात तर तुम्ही अतिरेकी आहात, अराजक पसरवत आहात. आहो होसबळेसाहेब, अन्नदाता जर त्याच्या कष्टाचं दान मागत असेल आणि याला तुम्ही अराजक मानत असाल तर तुमचं हिंदुत्व तुम्हाला लखलाभ असो. असं हे तुमचं भाडोत्री हिंदुत्व याला मी किंमत देत नाही. हे हिंदुत्व मला मान्य नाही, असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.