महाराष्ट्रात ‘महाविकास’ आघाडी, देशपातळीवर ‘इंडिया’ आघाडी एकजुटाने लढतेय आणि जिंकेल; उद्धव ठाकरेंचा ठाम विश्वास

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात येथे मतदान पार पडणार असून उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशपातळीवर इंडिया आघाडी एकजुटाने लढत असून नक्कीच विजयी होईल, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

वर्षाताईंना खासदार करून दिल्लीला पाठवणार आहे. देशामध्ये हुकुमशाही येता कामा नये. घटनेचे रक्षण झाले पाहिजे आणि घटना बदलता कामा नये. यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशपातळीवर इंडिया आघाडी एकजुटाने लढत असून नक्कीच विजयी होईल, असा विश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी हा माझ्या घरचा मतदारसंघ असून माझेही मत वर्षाताईंनाच असणार असल्याचे म्हटले. वर्षाताई मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा असून त्या कुठूनही लढू शकतात आणि जिंकू शकतात, असेही उद्धव ठाकरे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. तसेच उत्तर मुंबईची उमेदवारीही लवकरच जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पहिल्यांदाच पंजाला मतदान करणार आहात, या प्रश्नाचेही उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. पंजाला पहिल्यांदा मतदान करत असलो तरी त्या हातात मशाल आहे. त्याचा एकत्रित परिणाम होईल आणि त्यानंतर आम्ही तुतारी फुंकणार आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच सांगलीची जागाही आम्ही जिंकणार असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

फडणवीसांच्या आरोपांवर विचारले असता उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत संजय राऊत बोलले असून नाना पटोले यांनीही भाष्य केल्याचे म्हटले. चावीचे खेळणे असते आणि त्याला चावी दिली की ती संपेपर्यंत बोलावे लागते असे पटोले म्हणाले होते. संजय राऊतही त्यावर बोलले असून आज काही वृत्तपत्रात लेखही आलेले आहेत. गेल्या 2-3 दिवसांमध्ये क्लीन चिट देण्यात आलेल्या आहेत. 70 हजार कोटींचा घोटाळा, शिखर बँक घोटाळा याबाबत कालपर्यंत ज्यांच्यावर तुम्ही आरोप करत होता ते लोक तुमच्याकडे आल्यावर क्लीन चिट कशी मिळाली याचे उत्तर जनतेला द्यावे लागणार आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, उत्तर–मध्य मुंबईत हा माझ्यासाठी नवखा मतदारसंघ नाही. मी गेल्या 10 महिन्यापासून या मतदारसंघात आहे. फक्त हा मतदारसंघच नाही तर मुंबईतील सर्व सहाच्या सहा जागा महाविकास आघाडीच्या निवडूण आणण्याचा प्रयत्न असून 2004 ची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.