विगमध्ये लपवले ड्रग, युगांडाच्या महिला तस्कराला मुंबई विमानतळावरून अटक

नववर्षाच्या अनुषंगाने युगांडा येथून आलेल्या महिलेने केसाच्या विगच्या आड कोकेन तस्करीचा प्रयत्न केला. अखेर त्या महिलेला महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) अटक करून तिच्याकडून 8.9 कोटीचे कोकेन जप्त केले. ती ते ड्रग कोणाला देणार होती याचा तपास डीआरआयचे पथक करत आहे.

आफ्रिकन खंडातून एक महिला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग घेऊन येणार असल्याची माहिती डीआरआयच्या पथकाला मिळाली. त्यानंतर डीआरआयच्या पथकाने युगांडाच्या त्या महिलेची कसून चौकशी केली. तिने केसाच्या विगमध्ये, सॅनिटरी पॅड, व्हिस्कीच्या आणि मॉइश्चरायझरच्या बाटल्यांमध्ये द्रव्यरुपी कोकेन लपवले होते.

युगांडा देशातील महिलांच्या केशरचनांचा विचार करून तेथील तस्कराने तशा प्रकारचे विग बनवले होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्या केसाच्या विगमध्ये विशिष्ट कप्पा केला होता. त्या कप्प्यात तिने ते ड्रग लपवले. ड्रग तस्करीचा नवा मार्ग असल्याचे डीआरआयचे म्हणणे आहे.

परदेशातील ड्रग तस्कर हे ड्रग तस्करीसाठी विविध आयडिया लढवतात. तस्करीसाठी लहान मुली, महिला आणि वृद्ध नागरिकाचा वापर करतात. खासकरून आफ्रिकन खंडातील पॅरिअर असलेल्या महिलांकडून कधी शरीराच्या आत तर कधी कपडे, साहित्याच्या आड ड्रगची तस्करी केली जाते. आफ्रिकन महिलांना पॅरिअर म्हणून वापरल्यावर त्याना डॉलर आणि हिंदुस्थानची ट्रीप अशी ऑफर तस्कर करतात.