Uttar Pradesh: आठव्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली; आत अडकलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. नोएडा सेक्टर-137 येथील पारस टिएरिया सोसायटीच्या आठव्या मजल्यावरुन लिफ्ट थेट खाली कोसळून या घटनेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार सोसायटीतील लोकांना समजताच सर्वजण जमा झाले आणि एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पारस टिएराया हाउसिंग सोसायटीच्या टॉवर क्रमांक 24 च्या आठव्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक 803 मध्ये राहत असलेल्या 70 वर्षीय सुशीला देवी आपला मुलगा आणि सुनेसोबत राहत होत्या. गुरुवारी संध्याकाळी काही कामानिमित्त त्या आठव्या मजल्याच्या लिफ्टमधून खाली जात होत्या. दरम्यान काही तांत्रिक बिघाडामूळे त्या लिफ्टमध्ये चढताच अचानक लिफ्टची वायर तुटली आणि आठव्या मजल्यावरुन लिफ्ट थेट खाली पडली. त्यामुळे त्या लिफ्टमध्येच अडकून राहिल्या. लिफ्ट खाली पडल्याचा मोठा आवाज ऐकून सोसायटीत एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी गंभीर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच देखभाल करणाऱ्यांसह बिल्डरची देखील चौकशी सुरु केली आहे.