पीओके आपोआप हिंदुस्थानात विलीन होईल, माजी लष्करप्रमुखांचं महत्त्वपूर्ण विधान

कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देणारं कलम 370 हे 2019मध्ये रद्द करण्यात आलं. कलम काढल्यानंतर तरी कश्मिरातील पाकव्याप्त प्रदेश हिंदुस्थानात विलीन होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण, हा प्रदेश आपोआप देशात विलिन होईल, असं महत्त्वपूर्ण विधान माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी केलं आहे.

राजस्थानमधील दौसा येथे ते बोलत होते. यावेळी त्यांना पाकव्याप्त कश्मीरविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. त्यावेळी सिंह म्हणाले की, पाकव्याप्त कश्मीर लवकरच हिंदुस्थानात विलीन होणार आहे. त्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करा. लवकरच हे साध्य होईल, असं व्ही. के. सिंह असं म्हणाले.

त्याखेरीज राजस्थानातील विधानसभा निवडणुकांसंदर्भातही त्यांनी काही संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, याविषयीही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी राज्यातील निवडणुकांमध्ये भाजप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करत नाही. पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवते. त्यामुळे भविष्यातही अशा प्रकारे निवडणूक लढवली जाईल असे संकेत दिले आहेत.