भारतासाठी विज्ञान विश्व आशादायक!

>> प्रा. विजया पंडित

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विश्वात प्रगत राष्ट्रांचा, चीनसारख्या साम्राज्यवादी राष्ट्राचा वरचष्मा पाहत आपल्या पिढय़ा गुजरल्या, पण 2023 या वर्षातील यशस्वी चांद्र मोहिमेने भारताचा उद्घोष वैश्विक पटलावर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही भारत हा एक प्रमुख दावेदार देश म्हणून पुढे आला आहे. या वर्षीच्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स रँकिंगमध्ये भारताने 81 व्या स्थानावरून 40 व्या स्थानावर झेप घेतली आहे. देशातील पेटंटस्ची संख्या 30 हजारांपर्यंत पोहोचली आहे आणि टेक्नालाजी इनक्युबेशन सेंटर्सची संख्या 650 वर पोहोचली आहे. त्यामुळे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मावळते वर्ष भारतासाठी उत्साहवर्धक आणि आशादायक ठरले आहे.

यंदाच्या वर्षीचे विज्ञान-तंत्रज्ञानातील, विशेषतः अवकाश संशोधनातील सर्वात मोठे यश म्हणजे भारताची यशस्वी चांद्र मोहीम. ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांची अनेक वर्षांची मेहनत 2023 मध्ये फळाला आली. ‘चांद्रयान-3’चे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरले आणि आपण अंतराळ विज्ञानात इतिहास घडविला. त्याचबरोबर गगनयानाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर प्रक्षेपकाचे यश आणि सूर्य मिशनअंतर्गत ‘आदित्य एल-1’च्या यशस्वी उड्डाणाने अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात आशाआकांक्षांनी भरारी घेतली. या यशामुळे भविष्यात भारताचे स्वतःचे अवकाश पेंद्रदेखील असू शकेल, या विचाराला बळकटी मिळाली. आपले शास्त्रज्ञ जगभरातील उच्च प्रतीचे तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनात आघाडी घेत आहेत. येत्या काळात ते अन्य देशांच्या शास्त्रज्ञांप्रमाणेच अवकाश पेंद्रात राहून सखोल संशोधन करू शकतील, ही बाब सरत्या वर्षातील कामगिरीने स्पष्ट केली आहे. चांद्र मोहीम ही तर केवळ सुरुवात आहे, हेदेखील भारताने जगाला सांगितले. आपण केवळ मानवासह अंतराळात जाणार नाही, तर आपल्या अभ्यासाची व्याप्ती ही मंगळ, गुरू आणि शुक्र ग्रहापर्यंत असे हेदेखील ठासून सांगितले आहे. तसेच सूर्याचे रहस्य उलगडण्यासाठी भारत झेप घेईल आणि तेदेखील स्वदेशी उपकरणे, तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्सच्या बळावर. जगाशी तुलना करायची झाल्यास अत्यंत कमी खर्चात भारत अंतराळ मोहिमा आखू शकतो हे आपल्या शास्त्रज्ञांचे सर्वात मोठे वैशिष्टय़ आहे.

अंतराळ तंत्रज्ञानात पुढचे पाऊल म्हणजे आपण केवळ अवकाशाचाच अभ्यास करतो आहोत असे नाही, तर पृथ्वीवरही अनेक प्रकारचे ठोस काम केले जात आहे. महाराष्ट्रात हिंगोली येथे ‘एलआयजीओ-इंडिया’ नावाने ‘लेसर इंटरफेरोमीटर ग्रेव्हिटेशनल वेब ऑब्जर्वेटरी’चे काम मावळत्या वर्षात सुरू झाले. याआधारे ब्लॅक होल आणि न्यूट्रॉन ताऱयांसारख्या महाकाय खगोलीय वस्तूंचे विलीनीकरण होताना निर्माण होणाऱया गुरुत्वाकर्षण लहरी ओळखता येणे शक्य राहणार आहे.

‘एआय’ क्षेत्र
इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अनेक क्षेत्रांतही भारतीय शास्त्रज्ञांनी आपला झेंडा यशस्वीपणे फडकवला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटिलिजन्ससारख्या क्षेत्रात भारताने अत्यंत प्रभावीपणे कामगिरी नोंदवत स्वतःचे स्थान बळकट केले आहे. तसेच ‘एआय’बाबत धोकादायक मानल्या गेलेल्या गोष्टींचे आकलन करण्याचा भारताचा विचारदेखील विकसित देशांच्या अगदी विरुद्ध राहिला आहे. या धोक्यांना घाबरण्याऐवजी या तंत्रज्ञानाकडे सकारात्मकतेने पाहून त्यास अधिक सक्षम करण्याची भूमिका भारताने अंगीकारली. चॅटजीपीटी आल्याने संपूर्ण जगभरात आता एआय तंत्रज्ञान माणसाची जागा घेतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे आणि त्याच्या संभाव्य दुष्परिणामांबाबत चर्चा सुरू झाली. मात्र ग्लोबल टेक्नॉलॉजी संमेलनात विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राज्यमंत्र्यांनी डीपफेक आणि सोशल मीडिया टॉक्सिटीला घाबरण्याऐवजी आर्टिफिशियल इंटिलिजन्स प्लॅटफॉर्म आणि नॉन-एआय प्लॅटफॉर्मला अधिक जबाबदार व सक्षमपणे साकारण्याची गरज बोलून दाखविली. हेल्थकेअर, शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत एआयचा वापर करू, असे जगाला दाखवून दिले.

संशोधनातही आघाडीचा प्रयत्न
या वर्षी सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात 5800 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशात 25व्या राष्ट्रीय विज्ञानाची संकल्पना ‘स्कूल टू स्टार्टअप्स इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट’ अशी असून या संकल्पनेतून विज्ञानाच्या पायाभूत विकासासाठी सरकार योग्य दिशेने विचार करत असल्याचे स्पष्ट होते. वास्तविक या वर्षी ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स रँकिंगमध्ये 81 व्या स्थानावरून भारताने 40 व्या स्थानावर उडी घेतली आहे. पेटंटची संख्यादेखील 30 हजारांपर्यंत पोचली आहे. देशात टेक इनक्युबेशन सेंटरची संख्या आज 650 पेक्षा अधिक झाली असून ती दहा वर्षांपूर्वी केवळ 155 होती.

टेक्नो स्टार्टअप्स
तरुणांत डिजिटल उद्योग आणि स्टार्टअप उभारण्याचा वाढता ट्रेंड पाहता त्यांची संख्या आता लाखाहून अधिक झाली आहे. या वर्षी भारत जगातील तिसरे मोठे टेक्नॉलॉजिकल स्टार्टअप इकोसिस्टम स्थापन करण्यात यशस्वी झाला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत नेतृत्व करू शकतो, या विचाराला बळकटी मिळाली आहे. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनाला आळा घालत हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठी ग्रीन एनर्जी विकसित करणे, बँकिंग, क्रिप्टो करन्सी आणि मेडिकल डेटाच्या सुरक्षेबाबत महत्त्वाची भूमिका बजावणाऱया ब्लॉक चेनव्यतिरिक्त रोबोटिक्स क्षेत्रातही भारताची विलक्षण प्रगती दिसून आली.

दूरसंचार क्षेत्र
या वर्षी ‘फाईव्ह-जी’चा वापर हा प्रायोगिक तत्त्वापर्यंत मर्यादित राहिला. साहजिकच त्याचा अपेक्षेप्रमाणे विस्तार न झाल्याने त्याची व्याप्ती वाढू शकली नाही, परंतु आगामी काळात त्याचा विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. ‘फाईव्ह-जी’ची कनेक्टिव्हिटी संपूर्ण देशात वाढणे, ‘फाईव्ह-जी’ तंत्रज्ञानाला पूरक असणाऱया उपकरणांचा विकास करणे, सर्वसामान्यांच्या हाती तंत्रज्ञान येणे या गोष्टींना आणखी वेळ लागणार आहे. याखेरीज भारताने ‘सिक्स-जी’च्या दिशेनेही वेगाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. नव्या वर्षात सुपर अॅप्सचे प्रस्थ वाढेल, अशी अपेक्षा आहे. एकाच अॅपच्या मदतीने युजर अनेक गोष्टी हाताळू शकतील. या अॅपच्या कामाला बळ मिळूनही अद्याप फारसा वेग आलेला नाही. त्याचप्रमाणे एअर टॅक्सीची चाचणी घेऊनही ती प्रत्यक्षात आणता आलेली नाही.

सेमीपंडक्टर निर्मिती आणि संरक्षणाव्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांतील तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने अमेरिकेबरोबर करार केले आणि त्याचा लाभ मिळणार आहे. शिवाय डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) विधेयक हे शेवटच्या टप्प्यात आले असून ते सर्वसामान्य नागरिकांचा डेटा चोरी होण्यापासून आणि आकडेवारीच्या माहितीचा दुरुपयोग रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय देशात विज्ञान क्षेत्रातील संशोधकांच्या कार्याची दखल घेण्यासाठी पद्म पुरस्काराच्या आधारावर विज्ञान पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार तीन विज्ञानरत्न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा गौरव शास्त्रज्ञांच्या आयुष्यभराच्या योगदानाला मान्यता देणार आहे. एपंदरीत विचार करता विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीच्या दृष्टीने भारतासाठी मावळते वर्ष अत्यंत आशादायक ठरले.