भाजपचे वॉशिंग मशीन… 10 वर्षांत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 25 बड्या नेत्यांना अभय

मोदींच्या ना खाऊंगा, ना खाने दुंगा घोषणेचा बुरखा टराटरा फाटला… भावना गवळी, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसूळ, यशवंत जाधव, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, कृपाशंकर सिंह यांची प्रकरणे थंड बस्त्यात

ना खाऊंगा, ना खाने दुंगा, असे म्हणणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने गेल्या दहा वर्षांत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 25 विरोधी नेत्यांना सोबत घेऊन अभय दिले आहे. भाजपसोबत आलेल्या 23 नेत्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दिलासा दिला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तृणमूल कॉँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे सुवेंदू अधिकारी, हिमंत बिस्वा सरमा यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बंद करण्यात आली आहेत. तर शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात गेलेल्या भावना गवळी, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसूळ, यशवंत जाधव, यामिनी जाधव, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, तसेच अलिकडेच कॉँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणारे अशोक चव्हाण, कृपाशंकर सिंह यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणाची चौकशी बंद करून थंड बस्त्यात ढकलली आहेत. ‘इंडियन एक्प्रेस’ या इंग्रजी दैनिकाने हा सगळा तपशील समोर आणत भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधी ढोंगी चेहऱयाचा बुरखा टराटरा फाडला आहे.

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या पेंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून 2014 ते 2025 या दहा वर्षांत देशभरात विरोधी पक्षातील विविध नेत्यांच्या मागे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चौकशीचा ससेमीरा लावण्यात आला. पेंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काँग्रेसचे 10, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रत्येकी 4, तृणमूल कॉँग्रेसचे 3, टीडीपीचे 2, आणि समाजवादी पार्टी आणि वायएसआर कॉँग्रेस यांचे प्रत्येकी एक, असे एकूण देशभरातील 25 नेत्यांना भाजपसोबत घेण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 12 नेत्यांचा यामध्ये समावेश असून यातील 11 जण 2022 नंतर आपला पक्ष सोडून भाजपसोबत आले आहेत.

भ्रष्टचाराचे आरोप असलेल्या विरोधी पक्षातील 25 नेत्यांना भाजपसोबत घेण्यात आले. त्यातील 23 जणांना दिलासा देण्यात आला असून त्यातील 3 जणांच्या केसेस पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तर 20 जणांच्या प्रकरणांवरील कारवाई थांबविण्यात आली आहे. आधी वेगाने फिरणारी चौकशीची चव्रे भ्रष्टाचाराचे आरोप असणारे विरोधी पक्षातील नेते भाजपसोबत आल्यावर थांबल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

ईडीचीही कुचंबणा इतर तपास यंत्रणांकडून गुन्हे दाखल झाल्यानतंर ईडी पुढे कारवाई करू शकते. जेव्हा इतर तपास यंत्रणा प्रकरण किंवा फाईल बंद करतात तेव्हा ईडीला प्रकरण पुढे नेणे कठीण होऊन जाते. अनेक प्रकरणांमध्ये ईडीकडून आरोपपत्रही दाखल करण्यात आले. परंतु, गरजेनुसार कारवाई करण्यात येत असल्याचे ईडीच्या अधिकाऩयांनी सांगितले.

– नारदा स्टींग ऑपरेशन प्रकरणात पश्चिम बंगालचे विरोधी पक्ष नेते सुवेंदु अधिकारी यांच्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली. ते खासदार असताना त्यांच्यावर आरोप करण्यात आले. 2019 पासून याप्रकरणी अधिकारी यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी मिळावी यासाठी सीबीआय प्रयत्न करत आहे. मात्र 2020 मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यावर पुढे कुठलीच कारवाई झाली नाही.

– आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावरील आरोपांचेही पुढे काहीच झाले नाही.2014 मध्ये शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सरमा यांच्या ठिकाणांवर छापे घातले. सरमा यांची कसून चौकशी करण्यात आली. परंतु, 2015 मध्ये सरमा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि या प्रकरणात पुढे काहीच प्रगती झाली नाही.

– तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार वाय एस चौधरी आणि काँग्रेसच्या माजी खासदार ज्योती मिर्धा यांनीही भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावरील गुह्यांच्या तपासात पुढे काहीच प्रगती झाली नाही. ईडीला त्यांच्याविरोधात कुठलेही पुरावे सापडले नाहीत.

सीबीआयचे अधिकारी काय म्हणतात?
एखाद्या नेत्यावरील आरोपांची चौकशी करताना सीबीआय पुरावे शोधून काढते. पुराव्याच्या आधारावरच आरोपपत्र दाखल केले जाते. परंतु, एकदा का त्या नेत्याने पार्टी बदलली की या प्रकरणांचा वेग आणि चौकशी मंदावते. खटला सुरु असतो परंतु, पुढे काहीच प्रगती होत नाही, असे सीबीआयच्या अधिकाऱयांनी सांगितले.

प्रफुल्ल पटेल
अजित पवार गटाचे नेते, गटाबरोबर जुलै 2023 सालापासून भाजपबरोबर
प्रकरण : विमान वाहतूक उड्डाणमंत्री असताना पटेल यांनी एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन या विमान पंपन्यांचे विलीनीकरण केले. विलीनीकरण करताना प्रफुल्ल पटेल यांनी 111 बोईंग विमानेही खरेदी केली. याची मे 2017 मध्ये सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरू झाली. मे 2019 मध्ये सीबीआयने सादर केलेल्या आरोपपत्रात आरोपी म्हणून पटेल यांचे नाव आले. त्याचबरोबर फायद्यात असलेले हवाई मार्गावर एअर इंडियाची उड्डाणे बंद करून त्या मार्गावर परदेशी पंपन्यांना उड्डाणांसाठी परवानगी देणे, परदेशी गुंतवणुकीतून प्रशिक्षण संस्था उभारल्याचाही पटेल यांच्यावर आरोप आहे. या सर्व प्रकरणात त्यांनी लॉबिंग करणाऱया दीपक तलवार यांची मदत घेतली.

घटनाक्रम
– मिंधे गटासह ते जून 2022मध्ये भाजपबरोबर गेले. त्यानंतर मार्च 2024 मध्ये सीबीआयने हे प्रकरण बंद करण्यासाठी क्लोजर रिपोर्ट सादर केला. n सध्या हा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात प्रलंबित आहे.

अशोक चव्हाण
काँग्रेसमधून 2024 मध्ये भाजपच्या घरात
प्रकरण: आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्था, मुंबईतील फ्लॅट वाटप प्रकरणातील प्रमुख आरोपींमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. सीबीआयने त्यांच्यावर नातेवाईकांसाठी दोन फ्लॅटच्या बदल्यात वाढीव फ्लोअर स्पेस इंडेक्सला मान्यता दिल्याचा आरोप केला होता. सीबीआय एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लॉण्डरिंग कायद्याखाली तपास सुरू केला आणि त्यांची चौकशी केली.
घटनाक्रम
– डिसेंबर 2011 : आदर्श गृहनिर्माण प्रकरणात सीबीआयने चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला.
– जुलै 2012 : सीबीआयने चव्हाण यांच्यावर आरोपपत्र दाखल केले.
– जानेवारी 2018 : सुप्रीम कोर्टाची कारवाईला स्थगिती.
– फेब्रुवारी 2024 : भाजपमध्ये प्रवेश.

छगन भुजबळ
सध्या भाजपासोबत सत्तेत
प्रकरण : 2006 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना तब्बल 100 कोटी रुपयांच्या पंत्राटात अनियमितता आढळल्याचा भुजबळ यांच्यावर आरोप होता. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि इंडीया बुल्स प्रकरणात महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2015 मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. मार्च 2016 मध्ये ईडीने त्यांना अटक केली. मे 2018 मध्ये त्यांना जामीन मिळाला. त्यावेळी त्यांनी परदेशात जाण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली. त्याला ईडीने आव्हान दिले. ईडीची याचिका चार वर्षांपासून प्रलंबित असल्याचे कोर्टाने निदर्शनास आणून दिल्यानंतर ईडीने याचिका मागे घेतली.
घटनाक्रम
– मार्च 2016 मध्ये ईडीने अटक केली
– एप्रिल 2016 मध्ये ईडीकडून आरोपपत्र दाखल
– मे 2018 मध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर जामिन
– सप्टेंबर 2021 विशेष न्यायालयाने सोडून दिले
– जुलै 2023 मध्ये अजित पवारांसोबत एनडीत सामील झाले
– नोव्हेंबर 2023 मध्ये विशेष न्यायालयाने हे प्रकरण गोगलगायीच्या गतीने सुरु असल्याचे निदर्शनास आणून दिले
– डिसेंबर 2023 मध्ये ईडीने परदेश प्रवासाच्या परवानगीला दिलेली आव्हान याचिका रद्द केली
– सध्या खटला सुरु आहे.

गीता कोडा 
काँग्रेसमधून 2024 मध्ये भाजपात प्रवेश
प्रकरण : झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांची बेहिशेबी मालमत्ता आणि कोळसा खाण वाटप अशा प्रमुख प्रकरणांत चौकशी सुरू आहे.
घटनाक्रम : सप्टेंबर 2012 – कोळसा खाण वाटपप्रकरणी सीबीआयने पती मधू कोडा यांच्यावर गुन्हा दाखल केला.
– डिसेंबर 2014 : सीबीआयकडून आरोपपत्र दाखल
– डिसेंबर 2017 : कोडा यांना शिक्षा
– जानेवारी 2018 : शिक्षेला कोडा यांनी स्थगिती मिळवली.
– फेब्रुवारी 2024 : गीता यांचा काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश.
– सध्याची स्थिती : इतर प्रकरणांची चौकशी संथ झाली आहे.

यामिनी आणि यशवंत जाधव
2022 मध्ये भाजपासोबत सत्तेत जाऊन बसलेल्या मिंधे गटातील आमदार व पदाधिकारी प्रकरण
आमदार यामिनी जाधव आणि त्यांचे पती नगरसेवक यशवंत जाधव यांची ईडीसह अनेक तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. फेमा कायद्याचे उल्लंघन करणाऱया तब्बल सहा पंपन्यांशी या दोघांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा संबंध असल्याचा आरोप यांच्यावर आहे. 2022 मध्ये जाधव यांनी या पंपन्यांपैकी एका पंपनीकडून तारण नसलेले कर्ज घेतले होते. याप्रकरणात आयटी विभागाने त्यांच्या 40 मालमत्तांवर टाच आणली होती.
घटनाक्रम
– फेब्रुवारी 2022 मध्ये आयटी विभागाने यामिनी आणि यशवंत जाधव यांच्या ठिकाणांवर छापे घातले.
– गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने यशवंत जाधव यांना समन्स बजावले.
– जून 2022 मध्ये मिंधे गटात सामील झाले.
– पुढे तपासात काहीच प्रगती नाही

भावना गवळी
मिंधे गटासह जून 2022 सालापासून भाजपबरोबर
प्रकरण: भावना गवळी यांच्या मालकीच्या ट्रस्टमध्ये 17 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईडीने या प्रकरणी भावना गवळी आणि त्यांचे सहकारी सईद खान यांच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकून तपास केला.
घटनाक्रम
– सईद खान याचा संबंध असल्याचे दाखवत मुंबईतील पावणेचार कोटींचे कार्यालयही जप्त केले.
– जून 2022 मध्ये मिंधे गटासह भाजपसोबत गेल्यानंतर त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

हसन मुश्रीफ
अजित पवार गटाचे नेते, जुलै 2023 सालापासून भाजपबरोबर
प्रकरण: कोल्हापूरच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्यावर फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये ईडीने घर आणि कार्यालयांवर तीन वेळा छापे टाकले. ईडीचा आरोप आहे की, कारखान्यासाठी 40 हजार शेतकऱयांकडून पैसे घेऊनही त्यांना कारखान्याचे शेअर सर्टिफिकेट देण्यात आलेली नाहीत.
घटनाक्रम
– शेतकऱयांकडून जो पैसा त्यांनी गोळा केला होता तो त्यांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या नावाने बनावट पंपन्यांमध्ये ग्तुंवला आहे.
– मुश्रीफ यांच्यावरील हे प्रकरण सुरू आहे. मात्र, ते भाजपबरोबर गेल्यानंतर ईडीने एकही कारवाई केलेली नाही.

प्रताप सरनाईक
मिंधे गटासह जून 2022 पासून भाजपबरोबर
प्रकरण : शेअर बाजाराशी संबंधित एका राष्ट्रीय पंपनीबरोबर व्यवहार करताना सरनाईक यांच्या पंपनीत मोठय़ा प्रमाणात घोटाळा झाला. या प्रकरणी नोव्हेंबर 2020 मध्ये ईडीने गुन्हा दाखल करून त्यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले.
घटनाक्रम :
– जून 2022 मध्ये मिंधे गटाबरोबर ते भाजपमध्ये गेले.
– सप्टेंबर 2022 मध्ये या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करून हे प्रकरण बंद करण्यात आले.

बाबा सिद्दिकी
काँग्रेसमधून 2024 मध्ये एनसीपी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सहभागी.
प्रकरण : मे 2017 मध्ये मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील अनियमिततेच्या प्रकरणाच्या संदर्भात ईडीने मुंबई काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्याशी संबंधित मालमत्तांची झडती घेतली. 2018 मध्ये, ईडीने या प्रकरणात सहभागी असलेल्या एका विकासकाची 450 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्तादेखील जप्त केली होती.
घटनाक्रम
– मे 2017 : ईडीकडून छापे
– फेब्रुवारी 2024 : अजितदादा पवार यांच्या एनसीपीमध्ये सामील
– सध्याची स्थिती – तपास सुरू आहे.

अर्चना पाटील
मार्च 2024 मध्ये भाजपमध्ये प्रवेश
प्रकरण: एप्रिल 2017 मध्ये, आयकर विभागाने एनव्ही ग्रुपच्या कार्यालयावर छापा टाकला होता. त्यांचे पती, माजी पेंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते शिवराज पाटील यांचे पुत्र शैलेश पाटील हे या पंपनीत संचालक आहेत. शैलेश हे महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने असे निरीक्षण नोंदवले की, छाप्यादरम्यान काहीही दोषी आढळले नाही आणि त्यामुळे आयटी विभाग नवीन कर मागण्या करू शकत नाही. 30 मार्च रोजी अर्चना यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
घटनाक्रम
– एप्रिल 2017 : पतीच्या पंपनीवर आयकर विभागाचा छापा.
– मार्च 2024 : भाजपमध्ये प्रवेश.
– सध्याची स्थिती : आयकर न्यायाधिकरण म्हणते केसच नाही.

कृपाशंकर सिंह
काँग्रेसमधून 2021 मध्ये भाजपात उडी
प्रकरण: 2012 मध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या कृपाशंकर यांच्यावर पोलिसांनी बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला होता. या एफआयआरच्या आधारे ईडीने त्यांची मनी लॉण्डरिंग कायद्याखाली तपास सुरू केला आणि मुलांची चौकशी केली.
घटनाक्रम
– फेब्रुवारी 2012 – पोलिसांचा सिंह यांच्यावर गुन्हा दाखल. लगेच ईडीची केस
– डिसेंबर 2013 – विधानसभा अध्यक्षांकडे पोलिसांची कारवाईसाठी अनुमतीची मागणी
– एप्रिल 2015 – सिंह यांनी जमवलेल्या 95 कोटींच्या मालमत्तेतील 18 कोटींची मालमत्ता कथितपणे बेहिशेबी असल्याचा आरोप करणारे आरोपपत्र अनुमतीविनाच दाखल
– फेब्रुवारी 2018 – अनुमती नसल्यामुळे कोर्टाकडून मुक्तता
– सप्टेंबर 2019 – काँग्रेसचा राजीनामा
– जुलै 2021 – भाजपमध्ये प्रवेश
– खटल्याची सद्यस्थिती – ईडी केस निरर्थक ठरली.

रानींदर सिंह
पंजाबचे माजी मुख्यमंत्री पॅप्टन अमरींदर सिंह यांचे पुत्र असून 2021 मध्ये भाजपात प्रवेश
प्रकरण : फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु होती. 2016 मध्ये त्यांची ईडीकडून कसून चौकशी झाली.2018 मध्ये अमरिंदर सिंह यांचे जावई गुरपाल सिंह यांची सिंभाओली शुगर पंपनीतील तब्बल 98 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली.
घटनाक्रम
– नोव्हेंबर 2019 मध्ये रानींदर यांची ईडीकडून कसून चौकशी
– सप्टेंबर 2022 मध्ये अमरींदर यांचा भाजपात प्रवेश
– सध्याच्या घडीला आरोपांबाबत कुठलीही प्रगती नाही

नवीन जिंदाल
2024 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश
प्रकरण : हरयाणातील उद्योगपती नवीन जिंदाल यांच्यावर 2016 आणि 2017 मध्ये दोन वेगवेगळय़ा कोळसा खाण वाटप प्रकरणांमध्ये सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते. त्यांच्याविरुद्ध मनी लॉण्डरिंगची चौकशी करणाऱया ईडीनेही या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. एका प्रकरणात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. ईडीने जिंदाल स्टील अॅण्ड पॉवर पंपनीत आणि नवीन जिंदाल यांच्यावर एका कथित विदेशी चलन कायद्याच्या उल्लंघनप्रकरणीही एप्रिल 2022 मध्ये छापे टाकले.
घटनाक्रम
– जून 2013 – कोळसा खाण वाटपप्रकरणी दाखल एफआयआरमध्ये सीबीआयने जिंदाल यांचे नाव घेतले.
– 2016-17 – आरोपपत्र दाखल
– एप्रिल 2022 – विदेशी चलन कायद्याखालील नव्या केसमध्ये ईडीचे छापे
– मार्च 2024 – भाजपमध्ये प्रवेश
– सध्या ईडी तपास करतेय पण तपास मंद झाला आहे.

दिगंबर कामत
काँग्रेसमधून 2022 मध्ये भाजपमध्ये प्रवेश
प्रकरण : लुईस बर्जर घोटाळाप्रकरणी गोव्याच्या या माजी मुख्यमंत्र्यांची 2015 पासून चौकशी सुरू होती. याचप्रकरणी ईडीने कामत आणि एनसीपी नेते चर्चिल अलेमाव यांच्या जवळपास 2 कोटी रुपयांची मालमत्तेवर टाच आणली. सप्टेंबर 2022 मध्ये कामत यांनी काँग्रेसच्या 8 आमदारांसह भाजपची वाट धरली.
घटनाक्रम
– घडले ते असे – ऑगस्ट 2015 – ईडीकडून कामत यांच्या घराची झडती.
– मार्च 2017 – ईडीकडून मालमत्तेवर टाच
– जुलै 2021 – कोर्टाकडून आरोप निश्चिती
– एप्रिल 2022 – ईडीची मालमत्तेवरील कारवाई रद्द करण्याच्या मुंबई हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टातही कायम
– सप्टेंबर 2022 – कामत यांचा भाजपमध्ये प्रवेश
– सध्या खटला प्रलंबित आहे.

– सपातून 2019 मध्ये भाजपात प्रवेश करणारे संजय सेठ यांच्या समूहाची चौकशी थंड बस्त्यात गेली आहे.
– तृणमूलचे तापस रॉय, सोवेन चटर्जी भाजपात गेल्यानंतर ईडी चौकशी मंदावली आहे.
– तेलगू देसमच्या सुजना चौधरी आणि सीएम रमेश यांनाही अभय मिळाले आहे.