नगर जिल्हय़ात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

एप्रिल महिन्याचे शेवटचे 15 दिवस शिल्लक राहिले असतानाच नगरमध्ये प्रचंड उष्णता वाढली आहे. जिह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवू लागल्या आहेत. जिह्यातील 186 गावे व 958 वाडय़ा-वस्त्यांवरील तीन लाख 70 हजार 109 नागरिकांना 186 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भविष्यात दिवसेंदिवस टँकर्सच्या संख्येत वाढ होणार आहे. दरम्यान, जिह्यात उपलब्ध असलेला पाणीसाठा पाहता, पाणीटंचाई भीषण होण्याचा अंदाज आहे.

नगर जिल्हा प्रशासनाने निविदा काढून वर्षभर टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात टँकर्सची संख्या अवधी 24 होती, तर एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात टँकर्सची संख्या अवधी 106 होती. आता त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून, ही संख्या 181वर पोहोचली आहे. आगामी काळात यात आणखी वाढ होणार आहे.

यंदा पावसाने ताण दिल्याने जिह्यात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. जिह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आढावा बैठका झाल्या आहेत. त्यात टंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासनाने मागेल त्या गावात आता टँकर सुरू करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, अद्यापि तालुक्यासह जिल्हास्तरावर टँकरचे प्रस्ताव पडून आहेत. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या धामधुमीतच पाणीटंचाई वाढत असल्याने नेत्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. जिह्याचा विचार करता, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व राहुरी या चार तालुक्यांना टंचाईची झळ बसलेली नसल्याने या तालुक्यांत सध्या विहीर अधिग्रहण व टँकर्स सुरू झालेले नाहीत.

आकडेवारी

मंजूर टँकर ः 186 n मंजूर खेपा ः 501 n टंचाईग्रस्त गावे ः 186 n टंचाईग्रस्त वाडय़ा ः 958 n टँकरवर अवलंबून असलेली लोकसंख्या ः 3 लाख 70 हजार 109