देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याची ही लढाई आपण जिंकणारच! उद्धव ठाकरे यांचा विश्वास

भाजपविरोधात देशातील 26 विरोधी पक्ष एकवटले आहेत. बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक होत असून त्यात सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. देशातील जनता म्हणजे ‘INDIA’ भारत आहे. देशातील जनताही आता हुकूमशाही विरोधात एकत्र येत आहे. देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याची ही लढाई आपण जिंकणार आहोत, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

देशातील 26 पक्षांची दुसरी बैठक यशस्वी झाली आहे. तसेच हुकूमशाहीविरोधात देशातील जनताही एकत्र येत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आमच्या आघाडीचे नाव जाहीर केले आहे. ‘INDIA’ हे नाव आमच्या आघाडीचे ठरले आहे. ‘INDIA’ म्हणजे भारत या देशासाठीच आमचा लढा सुरू आहे आणि हेच नाव घेत आम्ही पुढे जात आहोत.सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की एवढे पक्ष एकत्र आले आहेत. प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगवेगळी आहे. राजकारणात विचारधारा वेगळी असणारच. त्यामुळे लोकशाही बळकट होते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

विचारधारा वेगळी असूनही आम्ही एकत्र आलो आहोत. कारण ही फक्त एका पक्षाची लढाी नाही. ही देशाची लढाई आहे. काहीजणांना असे वाटते की ही लढाई घराणेशाहीसाठी सुरू आहे. हो हा देशच आमचा परिवार आमचे कुटंब आहे आणि या परिवारासाठीच आम्ही लढत आहोत. या परिवाराचे आम्हाला रक्षण करायचे आहे.ही लढाई एका पक्षाविरोधात किंवा व्यक्तीविरोधात नाही, तर नीती, विचारधारा आणि हुकूमशाहीविरोधात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकेकाळी स्वातंत्र्यासाठी लढा देण्यात आला होता. बलिदानाने आणि समर्पणाने मिळवलेले स्वातंत्र्यच आता धोक्यात आले आहे. देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहेत. या लढाईत आम्हाला यश मिळेल, असा विश्वास आपल्याला आहे. सध्या देशातील जनतेच्या मनात भीती आहे. आम्ही जनतेला आश्वासन देतो की, घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. ‘हम है ना’ असा विश्वास आम्ही जनतेत जागवत आहोत. तुम्ही घाबरू नका, चिंता करू नका. एक व्यक्ती किंवा एक पक्ष म्हणजे देश असू शकत नाही. देशातील सर्व जनता म्हणजेच देश आहे. देशाची जनताच आता ‘INDIA’ म्हणजे भारत बनून उभी ठाकणार आहे. जनतेच्या पाठिंब्याने आपण आपला देश सुरक्षित ठेवणार आहोत. आज झालेली आमची बैठक यशस्वी झाली आहे. आता यापुढील बैठक महाराष्ट्रात मुंबईत होणार आहे. त्याची तारीख आम्ही ठरवणार आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.