वेब न्यूज – हॅलो ऑर्बिट

>> स्पायडरमॅन

हिंदुस्थानच्या ‘इस्रो’ या अंतराळ संस्थेने नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान आणि मंगळयान या मोहिमांच्या यशानंतर आता सूर्याच्या अभ्यासासाठी धाडण्यात आलेला उपग्रह आदित्य एल-1 हा आपल्या हॅलो ऑर्बिट या शेवटच्या कक्षेत यशस्वीपणे स्थापित करण्यात ‘इस्रो’ला यश मिळाले आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी आदित्य एल-1 ने आपला प्रवास सुरू केला होता आणि पाच महिन्यांच्या प्रवासानंतर त्याने आपल्या शेवटच्या कक्षेत प्रवेश केला. हॅलो ऑर्बिटमध्ये आदित्य एल-1 ला स्थापित करण्यासाठी त्याचे थ्रस्टर्स काही काळासाठी चालू करण्यात आले होते.

L-1 पॉइंटच्या आसपासच्या भागाला हॅलो ऑर्बिट असे म्हणतात. हा भाग सूर्य आणि पृथ्वी या दोन्ही प्रणालींमधील पाच अवकाशांपैकी एक आहे. या ठिकाणी पृथ्वी आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावांमध्ये संतुलन आहे. वास्तविक, हे स्थान दोन्हीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीला एकमेकांच्या दिशेने संतुलित करते. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये या पाच ठिकाणी स्थिरता आढळते. यामुळे येथे उपस्थित असलेल्या वस्तू सूर्य किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात अडकत नाहीत. सूर्याचा अभ्यास करणाऱया इतर चार उपग्रहांच्या यादीत आता आदित्य एल-1 ने स्थान मिळवले आहे. हॅलो ऑर्बिट या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्याने 37 लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. या यशामुळे आता हिंदुस्थानची पहिली सौर वेधशाळा अंतराळात प्रस्थापित झाली आहे.

आदित्य एल-1 हे सौर वादळांच्या घटनांमागचे कारण शोधून काढेल. यासोबतच सौर लहरींचे गूढ आणि त्यांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणामही तो उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. आदित्य एल-1 सूर्याच्या कोरोनापासून निघणारी उष्णता आणि उष्ण वारे यांचाही अभ्यास करेल. सौर वाऱयाचे विभाजन आणि तापमान यांचा अभ्यास करून सौर वातावरण समजून घेण्याचादेखील प्रयत्न करेल.