वेब न्यूज – चंद्राची रहस्ये

हिंदुस्थानच्या चांद्रयानाने यशस्वी उड्डाण केले आणि आता काही दिवसांतच ते चंद्रावर पोहोचेल. चांद्रयानाच्या या यशानंतर पुन्हा एकदा चंद्र आणि त्याची अजूनही अज्ञात असलेली रहस्ये पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहेत. 20 जुलै 1969 रोजी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले आणि चंद्राच्या रहस्यांमध्ये अधिक भर पडायला सुरुवात झाली. चंद्राची निर्मिती कशी झाली यावर आधी प्रचंड मंथन शास्त्रज्ञांमध्ये झाले होते. चंद्रावर प्रचंड मोठा महासागर आहे किंवा चंद्र म्हणजे वितळलेल्या लाव्हाचा एक गोळा असून तो पृथ्वी प्रदक्षिणा करत आहे अशी विविध मतांतरे होती. काही दशकांनंतर चंद्राचा जन्म अर्थात चंद्राची निर्मिती ही पृथ्वीपासून झाली असे गृहितक पुढे आले. अनेक तज्ञांच्या मते हे गृहितकदेखील अर्धवट आहे. ‘अपोलो 11’ या यानाने चंद्राच्या खडकांमधून मातीचा नमुना गोळा करून पृथ्वीवर आणला आणि त्याच्या अभ्यासातून काही गोष्टी समोर येऊ लागल्या. नासाचे शास्त्रज्ञ नोहा यांच्या मते चंद्रावर भरपूर पाणी आहे, पण ते बर्फाच्या रूपात चंद्राच्या पृष्ठभागाखाली आहे. तिथे बर्फाचे मोठे थर जमलेले आहेत. अर्थात, चंद्रावर एवढे पाणी पोहोचले कसे हेदेखील अजून रहस्य आहे. मात्र हे रहस्यदेखील लवकर उलगडेल असा त्यांना विश्वास आहे. महत्त्वाचे म्हणजे या पाण्याचा वापर करून अवकाशयानांसाठी नव्या प्रकारचे खास इंधन बनवता येईल असादेखील त्यांचा दावा आहे. चंद्रावर सतत होणारे भूपंपदेखील शास्त्रज्ञांना आश्चर्यचकीत करत असतात. या भूकंपांना ‘मूनक्वेक’ असे म्हणतात. हे भूपंप सतत का येत असतात याचे कोडेदेखील अजून शास्त्रज्ञांना उलगडलेले नाही. मात्र अपोलो एज सिस्मोमीटरने 1969 ते 1977 पर्यंत भूकंपाचे धक्के मोजले. त्या आकडेवारीचा अभ्यास करून शास्त्रज्ञ हे कोडे सोडवायचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने दावा केला आहे की, अब्जावधी वर्षांपासून सूर्यप्रकाश चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या काही विवरांवर पोहोचला नाही. या ठिकाणी तापमान -203 अंश सेल्सियसपर्यंत घसरू शकते.