आरक्षण मिळेपर्यंत शाळेत जाणार नाही; जालना जिल्ह्यातील माळेगावातील विद्यार्थी, पालकांचा निर्धार

अंतरवाली सराटीतील आंदोलनामुळे राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याची शपथ जालन्यातील बदनापूर तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी घेतली आहे. या संदर्भात शाळेतील विद्यार्थ्यांनी पालकांनाही विश्वासात घेतले आहे.

विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना निवेदन सादर केले. या निवेदनावर रामेश्वर धोत्रे, दत्ता गोडसे, गोरखनाथ धोत्रे, कुंडलिक गोरे, राजू कातूरे, विक्रम धोत्रे आदी मराठा समाजातील पालकांसह विद्यार्थ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

आरक्षण मिळेपर्यंत मतदान करणार नाही – कल्याण गोरे
मराठा समाज हा आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळावे, अशी जुनीच मागणी आहे. मात्र शासन या संदर्भात ठोस निर्णय घेत नाही. मराठा आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे, तर पालकांनीही आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याही निवडणुकीला मतदान करणार नाही असा निर्धार केला असल्याचे कल्याणराव गोरे यांनी सांगितले.