बायकोला शिकवलं आणि CRPFमध्ये नोकरीला लावलं, नवऱ्याचा खून करून प्रियकरासोबत पळून गेली

एका महिला सीआरपीएफ कॉन्स्टेबलने आपल्या प्रियकरासह मिळून नवऱ्याची हत्या केली आहे. या प्रकरणी झालेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. भीषण म्हणजे या प्रकरणातील आरोपी महिलेच्या नवऱ्याने आपल्या कुटुंबाविरुद्ध जाऊन तिला शिक्षण दिलं आणि नोकरी मिळवून दिली होती. पण, तिने अनैतिक संबंधांमुळे आपल्या नवऱ्याची हत्या केली आहे.

हा प्रकार राजस्थानच्या भरतपूर येथे घडला आहे. पूनम असं या आरोपी महिलेचं नाव आहे. पूनमचा विवाह 2010मध्ये संजयशी झाला. संजय हा प्रकृतीच्या कारणास्तव फक्त शेतीची कामं करत असे. त्यामुळे लग्नानंतर त्याने पूनमला शिकण्यास प्रोत्साहन दिलं आणि सरकारी नोकरीही मिळवून दिली. त्या वेळी त्याच्या कुटुंबाने या गोष्टीला विरोध केला. तरीही संजयने तिला शिकवून 2014मध्ये सीआरपीएफसाठी पाठवलं, तिथे तिची निवड झाली.

अडीच वर्षांपूर्वी तिची पोस्टिंग श्रीनगरला झाली होती. त्यादरम्यान तिची भेट रामप्रताप गुर्जर या दुसऱ्या सीआरपीएफ जवानाशी झाली. हळूहळू त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर तिची बदली दिल्लीला झाली. तरीही त्यांचे संबंध सुरूच होते. दोघं एकमेकांच्या संपर्कात होते. त्याच्याशी बोलता यावं म्हणून एक वेगळा फोनही तिने घेतला होता. त्या फोनवरून ती फक्त रामप्रतापशी बोलत असे. या फोनविषयी कुणालाही कसलीही कल्पना नव्हती. सासरीही ती चोरून त्याच्याशी संपर्कात होती. त्यावेळी जेव्हा संजयने तिला विचारलं, तेव्हा तिने रामप्रताप आपला मानलेला भाऊ असल्याचं सांगितलं. तरीही संशय आल्याने तिला सासरच्या मंडळींनी त्याच्याशी बोलण्याची मनाई केली. पण, तिने त्यांचं ऐकलं नाही.

त्यामुळे संजयला त्यांच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागला. त्याने विचारणा केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि संजयने पूनमला मारहाणही केली. त्यानंतर 31 जुलै रोजी तिने संजयला दिल्ली येथे बोलवलं. संजय दिल्लीला आल्यानंतर त्यांनी त्याला एका गाडीत बसवलं. त्या गाडीतच ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर रामप्रताप त्याला घेऊन राजस्थानच्या बानसूर येथे आला. त्याने तिथे संजयला तिथेच गाडलं. दरम्यान, संजयशी संपर्क न झाल्याने कुटुंब चिंतेत होतं. पण, तिने संजय दिल्लीला आला नसल्याचं पूनमने सांगितलं. संजयबाबत कोणताही मागमूस न लागल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयाच्या आधारावर पूनमला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा पूनमने सगळं सत्य सांगितलं.