महिला आयोगाच्या कार्यालयाचा अजित पवार गटाच्या प्रचारासाठी वापर; रुपाली चाकणकरांवर कारवाईची मागणी

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सरकारी कार्यालयाचा वापर अजित पवार गटाच्या निवडणूक प्रचारासाठी केला जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

राज्य महिला आयोग हा महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला वाचा पह्डून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करतो. निवडणूक प्रचारासाठी सरकारी कार्यालयांचा वापर करणे गुन्हा आहे. याची कल्पना असूनही महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून आयोगाच्या कार्यालयाचा वापर अजित पवार गटाच्या प्रचारासाठी केला जात आहे, असा आरोप काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी केली आहे.

महिला आयोगाचे अध्यक्षपद हे संवैधानिक पद असून चाकणकर यांनी त्या पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे, अशी टीका सव्वालाखे यांनी केली आहे. पक्षप्रचाराचे काम वरिष्ठांच्या दबावाखाली करावे लागत आहे का हे चाकणकर यांनी स्पष्ट करावे असे सव्वालाखे यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार केली असल्याचेही त्यांनी सांगितले.