फटके आणि फटाके- फायर है तू!

द्वारकानाथ संझगिरी

कुलदीप यादवकडून मला या विश्वचषकात फार मोठय़ा अपेक्षा आहेत. तो आपल्याला ब्रेकथ्रू मिळवून देऊ शकतो आणि मुख्य म्हणजे विकेट घेऊ शकतो. वन डेमध्ये फक्त धावा रोखायच्या नसतात. विकेट महत्त्वाच्या असतात. कारण त्यामुळे नव्या येणाऱ्या फलंदाजांवर दबाव टाकता येतो. त्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे धावांच्या गतीवर पडतो. प्रतिस्पर्धी संघाच्या हातात जितक्या विकेट्स कमी तेवढी त्याची जोखीम घेण्याची क्षमता कमी होते. म्हणून वन डेमध्ये अधिक विकेट मिळणं हे पगार अधिक बोनससारखं आहे.

कुलदीपकडे हा बोनस द्यायची ताकद आहे.

एक पूर्वीचं उदाहरण देतो. 1980 च्या सुरुवातीच्या दशकात लेगस्पिनर वन डेत फारसा खेळवला जात नसे. पुढे अब्दुल कादीर आणि शेन वॉर्नने ही थिअरी उद्ध्वस्त केली, पण तत्पूर्वी त्याचा पाया आपल्या शिवरामकृष्णनने घातला. 1984 साली ऑस्ट्रेलियात बेन्सन अॅण्ड हेजेस जागतिक स्पर्धेत भाग घ्यायला हिंदुस्थानी संघ जाणार होता. त्यावेळी सुनील गावसकर हा हिंदुस्थानचा कर्णधार होता. त्याला वासू परांजपे याने मी वर वर्णन केलेली थिअरी सांगितली आणि तो म्हणाला, ‘तू शिवरामकृष्णनला घेऊन जा. तो फार तर 10 षटकांत किती धावा देईल? 50? जास्तीत जास्त 60? (त्याकाळी या धावा प्रचंड होत्या) पण त्याने 3, 4 विकेट घेतले तर आपण त्यांच्या मधल्या फळीपलीकडे जातो.’

सुनीलला ते पटलं. तो शिवाला घेऊन गेला. तो मॅचविनर ठरला.

हीच गोष्ट कुलदीप करू शकतो. कुलदीपकडे आणखीन एक प्लस पॉइंट आहे. तो लेगस्पिनरप्रमाणे मनगटाने चेंडू फिरवत असला तरी तो डावखुरा फिरकीपटू आहे. तो चायनामन टाकतो. म्हणजे मनगटाने तो चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजाला आत आणतो. आणि त्याच्याकडे गुगली असेल तर त्याच अॅक्शनमध्ये चेंडू बाहेर काढतो. उजव्या हाताच्या लेगस्पिनरची उलटी प्रतिमा. पण चायनामन गोलंदाज फार कमी पाहायला मिळतो. त्यामुळे अशा प्रकारचा गोलंदाज जगातले बहुसंख्य खेळाडू फार क्वचित खेळतात. अलीकडच्या काळात म्हणजे 10,  15 वर्षांपूर्वी खेळलेला म्हणजे ब्रॅड हॉग. मी त्याआधी पाहिलेला म्हणजे सोबर्स. त्याआधी फ्लीटवूड स्मिथ, पॉल अॅडम्स, वॉर्डल वगैरे होते. कुलदीप हिंदुस्थानसाठी खेळलेला पाहिला.

सुरुवातीला तो हवा तेवढा भेदक नव्हता. कारण एकतर ही कला सोपी नाही. त्यातलं काwशल्य आत्मसात करायला वेळ लागतो. दिशा आणि टप्प्यावर हुकूमत पटकन येत नाही.

कुलदीप आधी वेगवान गोलंदाजी टाकायचा. त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला स्पिन टाकायला सांगितलं. त्याला राग आला. तो 10 दिवस मैदानावर गेला नाही. त्याला प्रशिक्षकांनी सांगितलं, ‘इथे यायचे आहे तर स्पिन गोलंदाजी टाकायची.’ त्याने पाहिला चेंडू टाकला तो चायनामन होता, पण त्या चेंडूला चायनामन म्हणतात ते त्याला ठाऊक नव्हतं.

2021 साली त्याच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं. त्यानंतर त्याच्या गोलंदाजीत चांगला बदल झाला. त्याने मेहनत घेतली. त्याचा रनअप बदलला. अधिक सरळ झाला. चेंडूच्या वेगात बदल झाला. चेंडू अधिक वळायला लागला. बॅटवर अधिक जोमात यायला लागला. गुगली प्रभावी ठरला. हळूहळू तो अधिक प्रभावी होतोय. मुख्य म्हणजे विकेट घेतोय. वन डे मध्ये 10 ते 40 षटकांत फलंदाजांचं जास्त फावतं. वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षक असतात. त्यावेळी जर कुलदीप विकेट देऊ शकला तर प्रतिस्पर्ध्यांच्या धावा रोखता येतील. तो दीप नव्हे फायर आहे. कोणतीही विकेट जाळू शकतो, काढू शकतो. कुलदीप स्वीकार आव्हान.