आता तरी जैसवाल खेळशील का? अयशस्वी खेळींमुळे वर्ल्ड कपचे स्थान धोक्यात

एकीकडे टी-20 वर्ल्ड कपच्या संघनिवडीची लगीनघाई सुरू आहे आणि दुसरीकडे आयपीएल आपल्या मध्यावर येऊन पोहोचलाय. तरीही हिंदुस्थानी फलंदाजीचा भावी आधारस्तंभ असलेल्या यशस्वी जैसवालच्या बॅटला सूर न सापडल्यामुळे क्रिकेट चाहते संभ्रमात पडले आहेत. त्याच्या बॅटला सूर सापडणे हे केवळ राजस्थान रॉयल्ससाठीच महत्त्वाचे नसून, हिंदुस्थान संघासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे आता तरी जैसवाल खेळशील का, असा सवाल क्रिकेटप्रेमींनी केला आहे.

गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग दोन द्विशतके ठोकून प्रकाशझोतात आलेला मुंबईकर यशस्वी जैसवालला हिंदुस्थानचा भावी सलामीवीर म्हणून पाहिले जात आहे. तो फॉर्मात येताच शुबमन गिलला तिसऱ्या स्थानावर पाठवत यशस्वी जैसवाल सलामीला उतरू लागला होता. आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्येही रोहित शर्माच्या जोडीला जैसवालला उतरविण्याचे प्लॅन आखले जात असताना त्याच्या अपयशी खेळीनी निवड समितीही बुचकळय़ात पडली आहे.

यंदाच्या आयपीएलला एकप्रकार वर्ल्ड कप ट्रायल मानली जातेय आणि या स्पर्धेत जो खेळणार त्यालाच टी-20 वर्ल्ड कपची तिकीट मिळल्याचे बोलले जातेय. अशावेळी भरवशाच्या यशस्वीच्या अपयशामुळे निवड समितीला दुसऱया पर्यायाची निवड करायला लागली तर अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जैसवालने गेल्या सहा डावांत 39, 24, 0 10, 5 आणि 24 अशा अयशस्वी खेळय़ा केल्या आहेत. तो वारंवार झटपट बाद झाला आहे. विशेष म्हणजे, यशस्वी अपयशी ठरत असला तरी त्याचा संघ राजस्थान रॉयल्स यंदाचा सर्वात यशस्वी संघ ठरतोय.

…तर जैसवालची जागा घेण्यासाठी अनेक शर्यतीत
हिंदुस्थानी संघात येण्यासाठी प्रचंड चुरस पाहायला मिळतेय. कधी कुणाचे भाग्य फळफळेल हे नेमकं कुणालाही सांगता येत नाही. जर जैसवाल आयपीएलमध्ये यशस्वी ठरलाच नाही तर निवड समितीला शर्यतीत असलेल्या दुसऱ्या खेळाडूंना संधी देणे बंधनकारक असेल. सध्या संघात शुबमन गिलचा पर्याय उपलब्ध आहेच, तसेच संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, रियान पराग या आघाडीच्या खेळाडूंनी जोरदार फलंदाजी करत निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. ही यादी येत्या दोन आठवडय़ांत आणखी वाढू शकते. या महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानचा 15 सदस्यीय संघ निवडला जाण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी निवड समिती सर्व पर्यायांचा अभ्यास करणार हे निश्चित आहे.