शून्य अपघात, सुरक्षित गोविंदांसाठी काम करणार, दहीहंडी असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

बाळगोपाळ जिवाची बाजी लावत दहीहंडी फोडण्यासाठी थरावर थर लावतात. पण अनेकदा थरांवरून पडून गोविंदा जखमी झाल्याच्या घटना घडतात. त्या पार्श्वभूमीवर गोविंदांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण, सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी राज्यस्तरावर दहीहंडी असोसिएशन ही 350 हून अधिक गोविंदा पथकांनी एकत्र येत नवी संघटना स्थापन केली असून ती ‘शून्य अपघात, सुरक्षित गोविंदा’साठी काम करणार आहे. तळागाळातील गोविंदा पथकांना डोळय़ासमोर ठेवून स्थापन करण्यात आलेल्या या दहीहंडी असोसिएशनची कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे.

राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा दिला असला तरी दहीहंडी उत्सवाचा काळ वगळता गोविंदा पथके आणि त्यांचे खेळाडू दुर्लक्षित असतात. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्याबरोबरच सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, सरकारच्या माध्यमातून विम्याचे संरक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी माझगाव ताडवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रशिक्षक अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दहीहंडी असोसिएशनची स्थापना करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे कार्याध्यक्ष विजय निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली. असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी समीर पेंढारे, अतुल माने, राकेश यादव, रोहिदास मुंडे, संदीप पाटील, सरचिटणीसपदी कमलेश भोईर, राहुल पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर सहचिटणीस, दोन खजिनदार, सहखजिनदार, प्रसिद्धीप्रमुखासह आठ प्रतिनिधींची सभासद म्हणून तर ‘स्पायडरमॅन’ गौरव शर्मा यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यावेळी अध्यक्ष अरुण पाटील, अभिनेता सुशांत शेलार, समीर पेंढारे, राकेश यादव, विजय निकम आदी उपस्थित होते.

महिला गोविंदा पथकांना न्याय मिळवून देणार

सध्या मुंबई, ठाण्यात अनेक महिला गोविंद पथके असून त्यांच्याकडून पाच-सहा थर लावले जातात. मात्र दहीहंडीच्या दिवशी त्यांना थर लावण्यासाठी फारशी संधी मिळत नाही. तसेच त्यांना दिल्या जाणाऱया पारितोषिकाची रक्कम मर्यादित असतो. त्या पार्श्वभूमीवर महिला गोविंदा पथकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अरुण पाटील यांनी स्पष्ट केले.

वरळीत प्रो-दहीहंडीचा थरार

प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये 31 ऑगस्ट रोजी सायं. 6 ते रात्री 10 या वेळेत प्रथमच प्रो-गोविंदा आयोजित करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने आयोजित केलेल्या प्रो-गोविंदा स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार असून पहिले बक्षीस 11 लाख रुपये, दुसरे 7 लाख रुपये, तिसरे 5 लाख रुपये आणि चौथे बक्षीस 3 लाख रुपये असे आहे. महिला संघ आणि अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल एक लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे.