आरटीई प्रवेश! आतापर्यंत साडेसहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी केले अर्ज

आरटीईची 25 टक्के कोटा प्रवेशाची प्रक्रिया काल मंगळवारपासून सुरू झाली असली तरी पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक जिल्हे वगळता राज्यातील इतर जिह्यांतून प्रवेश अर्ज भरण्यास फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. आतापर्यंत अनेक जिह्यांतून 50 हून कमी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज आले आहेत. सिंधुदुर्ग जिह्यातून आतापर्यंत एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश अर्ज दाखल झालेला नाही. बुधवारी दुपारपर्यंत सुमारे 7 हजारांपर्यंत अर्ज दाखल झाले आहेत.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के आरक्षित जागांवर ऑनालाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राज्यातील 76 हजार 36 शाळांमधील 8 लाख 86 हजार 159 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यातील बहुतांश शाळा या शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच आहेत. त्यामुळे किती पालक प्रवेशास पसंती देतात याबाबतचे चित्र पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. 16 एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून पालक https://student.maharashtra.gov.in/admÀortal या वेबसाईटवरून येत्या 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

तर मग आरटीई प्रवेश का घ्यायचा…

आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरताना केवळ सरकारी आणि अनुदानित शाळांची यादीच वेबसाईटवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालकांची घोर निराशा झाली आहे. सरकारी शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर आरटीईच्या ऑनलाईन प्रवेशामध्ये वेळ का घालवायचा? आरटीईचा अर्ज न भरतासुद्धा सरकारी शाळेत प्रवेश सहज मिळतो, तर मग ऑनलाईन प्रक्रियेचा खटाटोप कशासाठी? असा सवाल पालकांनी केला आहे.

आतापर्यंत जिल्हानिहाय आलेले अर्ज

नगर 246, अकोला 47, अमरावती 136, छत्रपती संभाजीनगर 353, भंडारा 30, बीड 100, बुलढाणा 53, चंद्रपूर 46, धुळे 50, गडचिरोली 4, गोंदिया 51, हिंगोली 25, जळगाव 154, जालना 71, कोल्हापूर 44, लातूर 80, मुंबई 254.