तुला कोणता त्रास झाला ते आम्हाला सांग! आंध्र संघटनेची हनुमा विहारीला नोटीस

रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात आंध्रचा मध्य प्रदेशविरुद्ध झालेल्या पराभवानंतर हनुमा विहारीने संघटनेत हस्तक्षेप मोठय़ा प्रमाणात वाढला आहे आणि त्यामुळे आपल्याला कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर अवघे आंध्र क्रिकेट ढवळून निघाले होते. या प्रकरणातील तथ्य समोर यावेत आणि विहारीला नक्की कसला त्रास झाला हे जाणून घेण्यासाठी आंध्र क्रिकेट संघटनेने Hanuma Vihari याला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे, मात्र विहारीने त्यांच्या नोटिसीला अद्याप उत्तर दिलेले नाही.

रणजी उपांत्यपूर्व सामन्यातील घटनांमुळे संघटनेला फार मोठा धक्का बसला आहे. विहारीने केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे ते लवकरच समोर येईल. पण हे जाणून घेण्यासाठी आंध्रने नोटीस पाठवली आहे. आता आम्ही हनुमा विहारीच्या उत्तराची वाट पाहतोय. आम्हाला हे प्रकरण फार खेचायचेही नाही आणि लांबवायचेही नाही. मात्र गेल्या महिन्यात विहारीने नेमके असे का केले आणि संघटनेवर आरोप का लावले हेच आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तो आमच्याकडे आला नव्हता म्हणून त्याला नेमका कोणत्या गोष्टीचा त्रास झाला, हे सांगण्याची संधी मिळाली असल्याचे आंध्रच्या एका अधिकाऱयाने सांगितले.

हनुमा नेमका काय म्हणाला

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यानंतर हनुमाने आपला राग व्यक्त करताना एक पोस्ट लिहिली. त्यात तो म्हणाला, बंगालविरुद्धच्या सामन्यात मी कर्णधार होतो. या सामन्यात मी 17 व्या क्रमांकाच्या खेळाडूवर ओरडलो. तेव्हा त्याने राजकीय व्यक्ती असलेल्या आपल्या वडिलांकडे माझी तक्रा केली होती. त्यावेळी त्या राजकीय व्यक्तीने माझी तक्रार एसीएकडे केली आणि मला कर्णधारपद सोडण्यासाठी सांगण्यात आले. माझी कोणतीही चूक नसताना माझ्यावर ही कारवाई झाली. यानंतर विहारीने आपण यापुढे कधीही आंध्रसाठी खेळणार नसल्याचे त्या पोस्टमध्ये लिहिले होते.