आभाळमाया – नैसर्गिक उपग्रह

>> वैश्विक,  [email protected]

1957  पासून आजतागायत अवकाशात सोडले गेलेले कृत्रिम उपग्रह अनेक आहेत. अगदी हजारोंच्या संख्येने. त्यातील काही उत्तम कार्य करतायत, तर काही पूर्णपणे निकामी होऊन अंतराळी कचरा बनून फिरत आहेत. परंतु आठ ग्रहांचे नैसर्गिक उपग्रह हा सध्या खगोल अभ्यासकांच्या संशोधनातला महत्त्वाचा विषय आहे. तो अशासाठी की, समजा एखाद्या ग्रहावरच्या अतिशित किंवा अतितप्त अथवा वायुरूप वातावरणामुळे तिथे पोहोचणे अशक्य असले तरी भावी काळातील एक टप्पा म्हणून अवकाशयानांना एखाद्या ग्रहाचा, एखाद्या उपग्रहाचा उपयोग होऊ शकतो का, याची तपासणी करणे. ही ‘तपासणी’ समाधानकारक ठरली तर पुढे तिथे यान पाठवून वस्तीची चाचणी घेता येऊ शकते.

आता आपला चंद्र आणि इतर सर्व ग्रहांचे उपग्रह हा केवळ कुतूहलाचा विषय राहिलेला नाही. त्यापासून निश्चित असा काही लाभ घेता आला, तर तो खगोल संशोधकांना आणि पर्यायाने आगामी काळातील आंतरग्रह प्रवासासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. म्हणूनच सध्या उड्डाण लांबले असले तरी अमेरिकेचे ‘अर्टेमिस’ त्यावरच्या ‘अपोलो’ यानातून चंद्रावर पुन्हा एकदा अंतराळवीर पाठवण्याच्या तयारीत आहे. चंद्र आता पृथ्वीबाहेरचा ‘अंतराळ-तळ’ होतो का ते त्यावरून ठरेल.

मग जी गोष्ट चंद्राबद्दल तीच इतर ग्रहांच्या अनेक उपग्रहांविषयीसुद्धा तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे. आपल्या ग्रहमालेतील ग्रहांची यात्रा करण्यासाठी चंद्राचे ‘स्टेशन’ उत्तम, परंतु गुरू-शनी-नेपच्यून यांच्याही पलीकडे जायचे तर पूर्वतयारीनिशी प्रस्थान ठेवायला ग्रहांचे ‘हॅबिटेबल’ म्हणजे वस्तीयोग्य उपग्रह उपयोगी पडतील. निदान तिथून ‘इंधन’ भरून किंवा आणखी काही पूर्वतयारीसाठी त्याचा वापर करता येईल.

मात्र त्यासाठी या ग्रहांचे स्वरूप ‘उतरण्यायोग्य’ असायला हवे. असे किती नैसर्गिक उपग्रह कोणकोणत्या ग्रहांभोवती फिरत आहेत याचाही अंदाज घ्यावा लागेल. आपल्या पृथ्वीभोवती एकच नैसर्गिक उपग्रह फिरतो तो आपला चंद्र हे नव्याने सांगण्याची गरज नाही. 1969 मध्ये माणूस चंद्रावर पोहोचला त्याआधीपासूनच सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरवर असलेल्या या आपल्या उपग्रहाचा अभ्यास सुरू झाला होता. त्यावरील खाचखळग्यांचे, विवरांचे फोटो आधीच्या कृत्रिम उपग्रहांनी घेतले होते. तेव्हापासूनच सर्व ग्रहांच्या नैसर्गिक उपग्रहांची चर्चा सुरू झाली. सूर्याभोवती सर्वात जवळून फिरणाऱ्या बुध ग्रहाला स्वतःचा नैसर्गिक उपग्रह नाही. पश्चिमेला सूर्योदय होणारा शुक्रही नैसर्गिक उपग्रह मिरवत नाही. आपला एकुलता एक चंद्र तर मंगळाचे दोन छोटे नैसर्गिक उपग्रह म्हणजे फोबो आणि डियो, परंतु ते आकाराने अवघ्या काही किलोमीटर क्षेत्रफळाचे असल्याने त्यावर उतरणे किंवा वस्ती शक्य नाही. त्यापेक्षा सरळ मंगळपृष्ठावर उतरणेच संशोधकांनी योग्य मानले आणि अनेक याने मंगळावर उतरलीसुद्धा. आता तर तिथे पर्यटन आणि वस्ती करण्याच्या गोष्टी होत आहेत.

सर्वात कुतूहलाचा भाग पुढे म्हणजे मंगळापलीकडच्या महाकाय ग्रहांच्या अनेक नैसर्गिक उपग्रहांचा आहे. 1609 मध्येच गॅलिलिओ यांनी गुरूचे आयो, युरोपा, कॅलिस्टो आणि गॅलिमिड हे चार नैसर्गिक ‘चंद्र’ दुर्बिणीतून पाहिले होते. आजही आम्ही आकाशनिरीक्षण कार्यक्रमात ते दुर्बिणीद्वारा दाखवतो. या आणि गुरूच्या वेळोवेळी वाढत गेलेल्या नैसर्गिक उपग्रहांची तशी संख्या 95 वर पोहोचली आहे. मात्र त्यातले 72 कायमस्वरूपी असून ते तसेच राहतील. त्यातील 57 उपग्रहांचे नामकरण झालेय. त्यापैकी गॅनिमिड हा केवळ गुरूचाच नव्हे तर एकूणच ग्रहमालेमधला सर्वात मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. गुरूच्या एकूण चंद्रांपैकी 87 ‘अनिश्चित’ उपग्रहांपैकी काही सुलट (प्रोग्रेड), तर काही उलट (रिट्रोग्रेड) गतीने फिरतात. सरळगतीच्या उपग्रहांना हिमालय गटातील, तर उरलेल्यांचे कार्मे, ऍनॅन्के आणि पॅसिफे असे गट आहेत.

शनी या सुंदर वलये (कडी किंवा रिंग) असलेल्या ग्रहाला तर 146 ‘चंद्र’ आहेत. त्यातील 66 कायमी असून त्यापैकी गुरूच्या गॅनिमिडनंतरचा मोठा नैसर्गिक उपग्रह असलेल्या ‘टायटन’सह सात उपग्रहांवर पाणी आणि बर्फाचा साठा आहे. उरलेल्या 122 उपग्रहांचे इन्यूइट, नॉर्स आणि गॅलिक असे गट आहेत. त्याशिवाय शनीच्या रुंद कडय़ांमध्ये जे लहान-मोठे गोलक आहेत त्याला गणतीच नाही. त्यातील 150 गोलकांना ‘मूनलेटस्’ किंवा ‘बालउपग्रह’ असे म्हणतात. युरेनसला 27 ‘चंद्र’ असून त्यातील पाच प्रचंड आकाराचे आहेत. त्यावर पाणी आहे. 13 चंद्र युरेनसला असलेल्या ‘रिंग’मध्ये समाविष्ट त्यांची नावे शेक्सपिअरच्या कथानकामधील भूमिकांवरून देण्यात आली आहेत. नेपच्यूनला 14 ‘चंद्र’ असून त्यापैकी सर्वात मोठा ‘ट्रिटॉन’ या नैसर्गिक उपग्रहात नेपच्यूनभोवती फिरणाऱ्या सर्व ‘वस्तूं’पैकी 99 टक्के द्रव्य सामावलेले आहे. याशिवाय नेपच्यूनला सहा अनिश्चित उपग्रह आहेत. केवळ ट्रिटॉनवर जलसाठा असून त्याची गती मात्र उलट दिशेची आहे. प्लुटो या 2004 मध्ये ग्रहपद गेलेल्या खुज्या ग्रहांचे चंद्र कसे? ते पुढच्या लेखात पाहू.