मला उमजलेला कर्मयोग

> सीए अभिजित कुळकर्णी

कर्मयोग जो मला समजला, जो मला उमजला तो ह्या लेखात मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कर्म म्हणजेच कर्तव्य कर्म, आणि त्या कर्तव्य कर्मालाच आपल्या तत्त्वज्ञानामध्ये ‘धर्म’ म्हटलेले आहे. प्रत्येक माणसाचे काही नियत कर्तव्य असते जे नियतीने ठरवून दिलेले असते. तसेच देश, काल, परिस्थितीप्रमाणे ही माणसाला काही कर्तव्ये पार पाडावी लागतात. हे कर्तव्य करणे, सुयोग्यरीत्या पार पाडणे म्हणजेच कर्मयोग होय.

भगवद्गीता आणि कर्मयोग
भगवद्गीतेचा प्रारंभ होतो ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ या श्लोकाने आणि भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकातला शेवटचा शब्द आहे ‘मम’ म्हणजे माझा. अर्थात ‘ममधर्म’ म्हणजे ‘माझा धर्म’ माझे कर्तव्य काय आहे याची चर्चा भगवद्गीतेमध्ये केलेली आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले कर्तव्य प्रामाणिकपणे केले पाहिजे. काही वेळा परिणामांची तमा न बाळगताही कर्तव्य केली पाहिजे. हाच उपदेश महाभारत युद्धाच्या वेळी कृष्णाने अर्जुनाला केलेला आहे. गीता ही कृष्णाने अर्जुनाला कर्तव्य करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी सांगितली आणि म्हणूनच भगवद्गीता ही कर्मयोगच सांगते.

बुद्धी कर्मानुसारिणी
आपण ज्या प्रकारचे कर्म करतो त्या प्रकारे आपली बुद्धी होत जाते. जर आपण आपले कर्तव्य सोडून लोभापायी किंवा मोहापायी चुकीची कामे करायला लागलो, प्रामाणिकपणा सोडून भ्रष्टाचार करायला लागलो, नियंत्रण सोडून स्वार्थाने वागायला लागलो तर आपली बुद्धीही विपरीत होते आणि अशा बुद्धीने चालणाऱया लोकांचे निश्चितच अधःपतन होते. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी.

अर्थात आता हे कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा फक्त ते करण्यासाठी करू नये. ते करताना आनंदाने करावे, चिकाटीने करावे आणि आपले कर्तव्य अत्यंत उत्कृष्टपणे कसे पार पाडता येईल यासाठी प्रयत्न करावा. ह्यालाच ‘योगः कर्मसु कौशलम’ असे म्हटले आहे.

कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
श्रीराम आणि श्रीकृष्ण हे भारतीय समाजाचे आदर्श! ह्यांनी सदैव आपले कर्तव्यच केले. संसाराचा त्याग करून किंवा कुठल्याही कठीण प्रसंगी त्यांनी स्वतःचा धर्म सोडला नाही. स्वधर्मे निधनं श्रेयः आपले कर्तव्य कर्म करत असताना त्याचे परिणाम काहीही असले तरी स्वतःच्या धर्माचे पालन केल्यामुळे त्यामध्ये आपल्याला जे समाधान मिळते, त्यामधून जी फलप्राप्ती होते किंवा त्याची जी काही निष्पत्ती होते तीही नेहमीच समाधानकारक असते. त्यातून सुखप्राप्ती झाली नाही तरी समाधान हे निश्चितच मिळते आणि म्हणूनच प्रत्येकाने स्वतःचे कर्तव्य केले पाहिजे.

संयुक्त राष्ट्र संघ जेव्हा स्थापन झाला त्यावेळी जगातल्या विविध नेत्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले, संयुक्त राष्ट्र संघ यशस्वी व्हावा यासाठी काय केले पाहिजे. अनेकांनी मानवी मूल्यांची जोपासना आणि मानवाधिकारांबद्दल चर्चा केली. तथापि महात्मा गांधींनी मात्र एक गोष्ट सांगितली. प्रत्येकाने स्वतःचे नियत कर्तव्य केले तर दुसऱया माणसाच्या अधिकाराची जोपासना आपोआपच होणार आहे. महात्मा गांधींनी कर्मयोगालाच महत्त्व दिले आहे. आपण आपले कर्तव्य आपला धर्म नियमित आणि नीट पार पाडणे हाही एक योगच आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनीही हेच म्हटले आहे, ‘युक्त चेष्टस्य कर्मसू’ स्वतःचे योग्य कर्म करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. त्याबरोबरच योग साधना केली तर दुःखांचा परिहार होऊ शकतो.

मनुष्य हा पराधीन असला तरी त्याला स्वतःचे कर्तव्य कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्मण्येवाधिकारस्ते! त्याचे परिणाम काय होतील ह्यावर मनुष्याचे नियंत्रण असू शकत नाही. कारण परिणाम हे परिस्थिती, इतर लोकांची प्रतिक्रिया, साधनसंपत्ती देश, काल या गोष्टींवरही अवलंबून असतात. त्यांची जास्त तमा न बाळगता आपले कर्तव्य कर्म करत जावे.

विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था…

www.bymyoga.in (योगशिक्षक, भारतीय योग मंदिर)