ठसा – राजाभाऊ शेंबेकर

>> दुर्गेश आखाडे

एसटीमध्ये चालकाची नोकरी करत असताना गाण्याची आवड जोपासण्याचे काम राजाभाऊ शेंबेकर यांनी केले. गायनाची आवड गेली चाळीस वर्षे जोपासत चिपळूणच्या राजाभाऊ शेंबेकर यांनी गाण्याच्या एक हजारहून अधिक बैठका केल्या आहेत. राजाभाऊ शेंबेकर यांचे नाव राजाराम श्रीराम शेंबेकर. राजाभाऊंनी सुरुवातीला शालेय शिक्षण घेत असतानाच क्लीनरचे काम केले. क्लीनरचे काम करत असताना ते चारचाकी गाडी चालवायला शिकले. काही वर्षे त्यांनी ट्रान्स्पोर्टमधील ट्रकवर चालक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना 1984 मध्ये एसटीमध्ये चालकाची नोकरी मिळाली. सुरुवातीला दापोली आणि खेड विभाग आणि त्यानंतर सलग 25 वर्षे त्यांनी चिपळूण विभागात काम केले. राजाभाऊंच्या घरातच गाणं होतं. गाण्याचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्याचप्रमाणे त्यांचे चुलतेही गात असत. त्यामुळे घरातल्या संगीतमय वातावरणात त्यांचा गळा तयार झाला. दादरला ते टिळक मास्तरांकडे गाणं शिकले. नोकरी करत असतानाही त्यांचे गाण्यावर प्रेम होते. एसटीमधील चालकाची त्रासाची नोकरी असतानाही गायनासारख्या हळुवार क्षेत्रात राजाभाऊ शेंबेकर यांनी आपले अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली. गायनातील अनेक मान्यवर मंडळी मुंबई, पुण्यात राहत होती. त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे म्हणजे मुंबई, पुण्यात जावे लागे. अशा वेळी त्यांच्या मदतीला आली ती एसटीतील चालकाची नोकरी. राजाभाऊंनी कायम मुंबई, पुणे गाडीवरच आपली डय़ुटी लावून घेतली. रात्रभर ते गाडी चालवत असत आणि सकाळी डय़ुटी संपली की, ते मुंबईत पंडित रामभाऊ मराठे, आप्पा देशपांडे, छोटा गंधर्व आणि जितेंद्र अभिषेकी यांच्या मैफलीला जात. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून मार्गदर्शन मिळावे या उद्देशानेच ते चिपळूण – मुंबई गाडीवर डय़ुटी लावून घेत. जितेंद्र अभिषेकाRची मैफल पुण्यात असेल तर ते चिपळूण-पुणे गाडीवर आपली डय़ुटी लावून घेत. अशा रीतीने त्यांनी गाण्यातील बारकावे शिकायला सुरुवात केली. भजनांमध्ये ऑर्गन साथ आणि तबला साथही ते करतात. राजाभाऊ शेंबेकर यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय पुणे येथे संगीत विशारदपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी पंडित रामभाऊ मराठे, नूतन गंधर्व, आप्पासाहेब देशपांडे, पंडित जितेंद्र अभिषेकी, हभप कीर्तनसूर्य दत्तदासबुवा घाग, करवीर पीठाधीश श्रीमंत विद्याशंकर भारती महाराज यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. त्यांनी महाराष्ट्रभर विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम केले आहेत. राजाभाऊंनी भजनसम्राट परशुरामबुवा पांचाळ, दशरथबुवा मयेकर, विश्वनाथ बागुल, कान्होपात्रा किणीकर, रजनी जोशी, श्रुती सडोलीकर, डॉ.कविता गाडगीळ, प्रतिमा टिळक, डॉ.वंदना कट्टी, पं.नारायण बुडस, लालजी देसाई आणि आप्पासाहेब देशपांडे यांना हार्मोनियमसाथ केली आहे. हभप कीर्तनसूर्य दत्तदासबुवा घाग यांना 22 वर्षे ऑर्गनसाथ केली आहे. चारुदत्त आफळे, आनंदबुवा जोशी, ढोलेबुवा, कुबरेबुवा, दिगंबरबुवा नाईक, मकरंदबुवा सुमंत, देवरसबुवा, मिलिंद बडवे, शामबुवा धुमकेकर, डबीरबुवा, रामनाथ अय्यरबुवा यांना कीर्तन साथसंगत केली आहे. अनेक कलावंतांना त्यांनी तबलासाथ केली आहे. राजाभाऊंचे एसटीच्या स्टेअरिंगवरचे हात तितक्याच नजाकतीने तबला आणि हार्मोनियमवर फिरतात. स्वरगंध देवगड येथे राज्यस्तरीय नाटय़ संगीत स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. पनवेल कल्चरल सेंटरतर्फे आयोजित शास्त्राrय संगीत स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला होता. कीर्तन जुगलबंदी आणि गांधर्व महाविद्यालयातर्फे त्यांना संगीतकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आर्ट सर्कल रत्नागिरी, मीरा म्युझिक यांच्यातर्फे शास्त्राrय संगीताची ध्वनिफीतही प्रकाशित करण्यात आली आहे. ती ध्वनिफीत जर्मनी ऱिहदम हाऊसला रवाना करण्यात आली आहे. राजाभाऊंनी गायनक्षेत्रात आपला स्वतःचा ठसा उमटवला आहे. अनेक मैफली त्यांच्या गायनाने रंगल्या आहेत.