गुंतवणूक अन् मानसिकता : बिहेव्हिअरल फायनान्स जाणून घेणे आवश्यक

>> कौस्तुभ खोरमल

शेअर्समधील दीर्घकाळ स्वरूपातील गुंतवणूक व्यक्तीला श्रीमंत करते याबद्दल तर शंकाच नाही, पण व्यक्ती स्वतःच्या स्वभावाच्या विरुद्धदेखील जाऊ शकत नाही. याचे स्पष्टीकरण सकारात्मक दृष्टीने पहायचे असल्यास ‘बिहेव्हिअरल फायनान्स’बाबत जाणून घेणे गरजेचे आहे.

‘बिहेव्हिअरल फायनान्स’ म्हणजेच व्यक्तीची मानसिकता आणि पैसा या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करणे. याचा अभ्यास करण्याची नव्या पिढीला खरी गरज आहे. खर्च हे नेहमी उत्पन्नाहून अधिक होत असल्याची तक्रार ऐकू येते. सध्याची नवीन उत्पन्न कर प्रणाली सात लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱया व्यक्तीस आयकर लागू करत आहे. पण आयकर कायद्यातील कलम 80 सीद्वारे मिळणाऱया करमुक्त गुंतवणुकीस प्राधान्य देत नाही. म्हणजेच येणाऱया काळात देशाचे अर्थकारण पैसे खर्च करण्यावर अधिक भर देणारे आहे. त्यामुळे सामान्य नोकरदार वर्गाचा दरमहा उत्पन्नातील काही भाग दीर्घकाळ गुंतवणूक योजनेत गेलाच पाहिजे.

शेअरमधील गुंतवणूक हा संपत्ती निर्माण करण्यासाङ्गी एक पर्याय आहे. उदाहरणार्थ, सध्या विमा बाजारात टर्म इन्शुरन्स आले आहेत जे तुम्हाला विमा कालावधीत काहीही न झाल्यास पैसे परत करतात. टर्म इन्शुरन्स म्हणजे विमा कालावधीत व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला (नॉमिनीला) विमा रक्कम मिळते.

भरपूर परतावा मिळणाऱया गुंतवणूक पर्यायावर भर देण्यापेक्षा जीवनातील प्राथमिक गरजा लक्षात घेऊन गुंतवणूक करावी. आपण बचत केलेला एक-एक पैसा महत्त्वाचा आहे. तो योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास संपत्ती निर्माण होते. हा भाव प्रत्येकाच्या मनात रुजणे महत्त्वाचे आहे. येथे ‘संपत्ती’ हा शब्द सुदृढ शरीर या अर्थाने पाहणेदेखील गरजेचे आहे.

आपला स्वभाव खर्चिक असल्यास शेअर्समध्ये दीर्घकाळ गुंतवणूक पर्याय निवडला तरीही त्यामध्ये सातत्य राहणार नाही आणि योग्य भावात खरेदी केलेले शेअर्स कमी भावात विकण्याची शक्यता वाढेल. अल्पकाळ गुंतवणूक (एक वर्षापेक्षा कमी कालावधी) किंवा ट्रेडिंग स्वरूपात शेअरची खरेदी-विक्री (ट्रेड) केले तरीही खर्चिक स्वभाव असलेल्या व्यक्तीच्या हाती पैसे शिल्लक राहण्याची शक्यता कमी असते आणि शेअर्समध्ये अल्पकाळ गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करणाऱयासाठी गुंतवणुकीपेक्षा अधिक पैसे हाती खेळते असावे लागतात.

आपल्याला शेअर्समधील गुंतवणूकसोबत इतर दीर्घकाळ गुंतवणुकीचे पर्याय निवडण्यास मदत व्हावी म्हणूनच ‘बिहेव्हिअरल फायनान्स’ या विषयावर सविस्तर माहिती देत आहोत. गुंतवणूकबाबत आपले विचार किंवा मानसिकता स्पष्ट असल्याशिवाय भविष्यासाङ्गी निधी जमवता येणार नाही.

सेवानिवृत्तीनंतर नियमित आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठी पर्याय सुचवीत आहोत. त्यातील एक-दोन पर्यायांची निवड आणि सुरुवात तारुण्यात (वय वर्षे 50 पूर्वी) करायची आहे.

– पेन्शन स्वरूपात दरमहा उत्पन्न देणारी विमा योजना निवडावी.
– बँक मुदत ठेव योजनेत पैशांची गुंतवणूक करावी.
– भाडे स्वरूपात उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने कमर्शिअल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे.
– रिव्हर्स मॉर्टगेज हे निवृत्तीनंतरचे आर्थिक उत्पन्न स्रोत मिळण्याचा मार्ग आहे. त्यामुळे घराच्या इंटिरिअर (सुशोभीकरण) खर्च करण्यावर अधिक लक्ष न देता चांगल्या ठिकाणी घर घेण्याचा विचार प्रथम करावा.
– निवृत्तीनंतर किंवा इतर गुंतवणुकीतून (म्युच्युअल फंडद्वारे) एकरकमी मोठी रक्कम हाती आल्यास पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत पैशांची गुंतवणूक करावी.

थोडक्यात, व्यावहारिक सत्यता लक्षात घेऊन गुंतवणुकीचे किमान दोन-तीन पर्याय निवडणे गरजेचे आहे.

(प्राध्यापक आणि गुंतवणूक क्षेत्रातील जाणकार)