व्यावसायिक चित्रपटांचा कलात्मक लेखक

>> प्रिया भोसले

शोलेला परीस बनवणारी माणसं अगणित….ह्यातील महत्त्वाचा वाटा सलीम जावेद जोडीचा आहे हे कुणीही मान्य करेल. सामान्य कथेची असामान्य पटकथा लिहून इतिहासात नोंद होईल, लोकं वर्षानुवर्षे त्याची पारायणं करतील अशी पटकथा लिहणं कौतुकास्पद. तेही त्या काळात ज्या काळात श्रेयनामावलीत लेखकाचं नावही नसायचं.

जंजीरच्या वेळेची गोष्ट, इतकी तगडी कथा, पटकथा लिहूनही पोस्टरवर कथा, पटकथा लेखक म्हणून दोघांचं नाव नव्हतं. ते बघून मुंबईत जंजीरचे जितके पोस्टर्स लागले त्या सगळ्या पोस्टरवर सलीम-जावेद यांनी आपली नावे स्वतःच्या पैशाने रंगवून घेतली होती. तो प्रकार बघून मग निर्मात्यांनी शिस्तीत पोस्टरवर कथा, पटकथा लेखकांची नावे देण्यास सुरूवात केली. श्रेय मिळवण्यासाठी आटापिटा करावा लागणाऱ्या परिस्थितीत पटकथालेखक म्हणून नुसतं नाव येण्यासाठी नाही तर त्याला ग्लॅमर देणारे पहिले पटकथाकार म्हणून सलीम जावेद जोडीकडे पाहिलं जातं.

जावेदसाब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घ्यायचा म्हटला की जावेद अख्तर सोबत सलीम खान नाव जोडून येतंच.मग या दोघांनी मिळून दिलेल्या अतिशय सुंदर सुंदर चित्रपटांची मालिका दिसू लागते.हाथी मेरे साथी, अंदाज, सीता और गीता,यादों कि बारात, जंजीर, मजबूर, हाथकी सफाई, दिवार, शोले, त्रिशूल, डॉन,काला पत्थर, दोस्ताना, शान, क्रांती, शक्ती, कभी कभी, मिस्टर इंडिया सारखे सुपरहिट चित्रपट ह्या जोडगोळीच्या नावावर आहेत.शानही उत्तम होता फक्त शोलेसोबत त्याची तुलना केल्यामुळे अपेक्षित यश मिळू शकला नाही.तेव्हाही शानचं भवितव्य ओळखून जी पी सिप्पींना शान बनवू नका म्हणून जावेदसाबनी सल्ला दिला होता.सिप्पींनी ऐकलं नाही आणि सिनेप्रेमींना शान तेव्हा का चालला नाही सारखा आयुष्यभर पडणारया प्रश्नाची तजवीज करुन टाकली.

1973 च्या जंजीरपासून ते 1982 च्या शक्तीपर्यंत अमिताभसोबत त्यांनी चित्रपटसृष्टी गाजवली.एखाद्या सीनसाठीही तुम्ही ह्या त्रिकूटाचा चित्रपट बघू शकता इतके अविस्मरणीय ठरतील असे सीन लिहले.दिवारचा गोदामातला, त्रिशूलमधला अमिताभ संजीवकुमारच्या पहिल्या भेटीचा,काला पत्थरमधला खाणकामगारांची बाजू घेऊन प्रेमचोप्राला धमकवणारा सीन असो ह्या त्रिकूटाने पैसावसूल चित्रपटातील यादगार सीनमधून बहार उडवून दिली.शोले तर आजही डायलॉगचा बादशाह समजला जातो.एकापेक्षा एक सरस डायलॉग्समुळे मोठ्या पात्रांसोबत छोटी पात्रेही अजरामर केली.अमिताभ अभिनयामुळे झळकलाच असता पण सलीम-जावेद नसते तर एकूणच ह्या तिघांमुळे अप्रतिम चित्रपटांचा काळ म्हणून त्या काळावर शिक्कामोर्तब झालं नसतं,हे मात्र नक्की.

सलीम-जावेद जोडी विभक्त झाली तेव्हा अनेकजण हळहळले.दोघे स्वतंत्रपणे काम करु लागल्यानंतर जावेदसाब यांनी पटकथेसोबत चित्रपटांचीच गाणी हि लिहायला सुरुवात केली.ती हि तितकीच लोकप्रिय झाली. जावेदसाब यांचा गीतकार म्हणून सिलसिला पहिला चित्रपट होता.चित्रपटाचा नायक कवि असल्यामुळे यश चोप्रांना कविता करणारा गीतकार हवा होता.त्यादरम्यान साहीर लुधियानवी आजारी असल्यामुळे यश चोप्रा जावेदसाब यांच्याकडे आले.गीत लिहण्याचा कल नसल्यामुळे त्यांनी यश चोप्रांना ढिगाने अटी घातल्या,साहीरपेक्षा जास्त मानधनही मागितलं.चोप्रांनी त्या सारया अटी मान्य केल्यानंतर त्यांचा नाईलाज झाला.संगीतकार शिवहरींनी त्यांना एक धून ऐकवली आणि अर्ध्या दिवसात देखा एक ख्वाब तो ये गाण्याचा जन्म झाला.सिलसिलाची गाणी सुपरहिट झाल्यानंतर जावेदसाब यांची गीतकार म्हणून नवी कारकीर्द सुरु झाली.
1983 ला आलेल्या बेताबपासून जावेदसाब कथा,पटकथालेखक म्हणून स्वतंत्रपणे काम करु लागले.बेताबसाठी फिल्मफेयरचं बेस्ट स्टोरीसाठी अवॉर्ड ही मिळालं. त्यानंतर मग पटकथालेखक, गीतकार, डायलॉग रायटर अशा तिन्ही आघाडीवर घोडदौड सुरु झाली. त्यात ते यशस्वी ही झाले. 1981 पासून गीतलेखनाला सुरुवात केलेला प्रवास आजही तितकाच काळाशी सुसंगत वाटतो.सिलसिलापासून आताच्या द आर्चीस पर्यंत पाहिलं तर कळून येईल.प्रत्येक पिढीचं प्रतिबिंब उतरेल अशी गाणी त्यांनी लिहली.

गाणी हि किती सुंदर सुंदर … सिलसिला, लावारीस, मशाल, सागर, मि.इंडिया, तेजाब, गर्दीश, 1942 ए लव्हस्टोरी,पापा केहते है,सरदारी बेगम, 1947 अर्थ,फिर भी दिल है हिन्दुस्तानी,दिल चाहता है, जुबैदा,लगान,चलतेचलते,कल हो ना हो,वीरजारा,स्वदेस,कभी अलविदा ना केहना,नमस्ते लंडन,माय नेम इज खान,तलाश,गलीबाॅय,वेक अप सिड,डन्की नुसती नावं जरी ऐकली तरी त्यातली सुपरहिट गाणी डोळ्यासमोर येतात.

पद्म पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या जावेदसाब यांना लगान, गॉडमदर, रेफ्युजी, बॉर्डर साठी पाच वेळा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि आठ वेळा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 27 फिल्मफेयर पटकथालेखनासाठी, 12 आंतरराष्ट्रीय फिल्म अकादमी,9 झी सिने अवॉर्ड आणि लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड ही मिळाले आहेत.अजूनही मिळतील.टॅलेंटला वयाचं बंधन नसतं…ह्याचं उत्तम उदाहरण म्हणून जावेदसाब ह्यांच्याकडे बघता येईल.

लेखक,गीतकार म्हणून त्यांनी कारकिर्द जितकी गाजवली सोबत देशहिताच्या दृष्टिकोनातून धर्माच्या राजकारणाविरोधातही त्यांनी आपला आवाज बुलंद ठेवला.

मुलांच्या,नातवंडांच्या बर्थ सर्टिफिकेटमधे religion समोर not applicable लिहणारया जावेद अख्तर यांच्यासारखे समाजभान जपणारे फार कमी कलाकार आहेत. समाजस्वास्थ्य बिघडवणारया घटनेवरही मूग गिळून बसणारे आणि सत्ताधाऱ्यांचं लांगूचालन करणारया मोठमोठया कलाकारांमध्ये जावेदसाब खरया अर्थाने महान वाटतात.

17 जानेवारीला 79 वर्षे पुर्ण झालेल्या जावेदसाब यांनी लिहलेल्या ‘जिंदगी ना मिले दोबारा’ मधल्या ओळीत बारकाईने पाहिलं तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचंच प्रतिबिंब दिसेल.

“दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम!
नजर में ख्वाबों कि बिजलियाँ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम!
हवा के झोकों के जैसे आजाद रहना सिखो!
तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सिखो!
हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहे!
हर एक पल एक नया समा देखे ये निगाहे!
जो अपनी आँखो मे हैरानिया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम !
दिलो में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम!”