विज्ञान-रंजन – दुर्दैवी वॅविलॉव यांची दूरदृष्टी

>>विनायक

त्यांनी  एक रचनात्मक ध्यास घेतला. अपार परिश्रम घेतले. जगभरच्या दुष्काळावर मात करणाऱ्या सक्षम बियाण्यांचा शोध घेण्यासाठी अनेक देशांत भ्रमंती केली. पिकांचे विविध प्रकारच्या कीड आणि रोगांपासून संरक्षण कसे करता येईल यावर अथक प्रयोग केले. शेतकऱ्यांसाठी हितावह काम करताना स्वतःच्या प्रकृतीची पर्वा केली नाही. पूर्वायुष्यात त्यांच्या या कर्तृत्वाचे कौतुक झाले. मानसन्मान लाभला, पण उत्तरायुष्यात त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. एका संशयी, क्रूर राजवटीच्या रोषाला ते अक्षरशः बळी पडले.

या महान संशोधकाचे नाव निकोलय वॅविलॉव. त्यांच्याविषयी आणि त्यांच्या पिकांविषयीच्या संशोधनासंबंधी वाचलं ते साधारण 1970 च्या दशकात. तोपर्यंत त्यांच्या नावाला मरणोत्तर मान्यता प्राप्त झाली होती. त्यांची संपूर्ण थिअरी नाही तरी एक गोष्ट लक्षात राहिली ती म्हणजे हिंदुस्थान हे प्राचीन काळातील पीक निर्मितीचं जगातलं सर्वात मोठं केंद्र होतं आणि आपल्या देशातील सुमारे 70 टक्के भाग समृद्ध वनश्रीने व्यापला होता.

मध्यंतरी आमच्या खगोल मंडळातल्या मायक्रोबायॉलॉजीच्या प्राध्यापक असलेल्या डॉ. सुजाता देशपांडे यांच्याशी वॅविलॉव थिअरीवर अवचित चर्चेचा योग आला. मग त्यांच्याकडून आणि गुगलवरून अधिक माहिती मिळाली. सुमारे अर्धशतकापूर्वी मनात रूजलेल्या विषयाला उजाळा मिळाला. लव्हलॉक यांच्या पर्यावरण ध्यासानंतर वॅविलॉव यांच्या संशोधनावर लिहिलंच पाहिजे असं वाटू लागलं.

13 नोव्हेंबर 1887 ते 26 जानेवारी 1943 असा निकोलय वॅविलॉव यांचा काळ. त्यातला काही सुखाचा, तर काही भयंकर कठीण. चार दिवसांनी त्यांना जाऊनही 81 वर्षे होतील, पण त्यांच्या संशोधनाचं महत्त्व चिरंतन राहील. रशियात जन्मलेल्या वॅविलॉव यांचं कुटुंब अत्यंत गरिबीत जमीनदाराकडे वेठबिगार होतं. वॅविलॉव यांच्या वडिलांनी मोठय़ा हिकमतीने या जाचातून स्वतःची सुटका करून घेतली आणि कापड व्यवसाय सुरू केला. त्यांनी सोसलेल्या वेठबिगारीचे चटके त्यांना ठाऊक होते. म्हणूनच आपल्या कारखान्यातल्या कामगारांना त्यांनी उत्तम वेतन दिलं. सन्मानानं वागवलं. त्या काळात ही गोष्ट विशेष होती. अशा मानवतावादी पित्याचा मुलगा निकोलय याला मानवजातीच्या कल्याणासाठी काही करावंसं वाटणं साहजिक होतं. त्या काळात रशियातल्या शिकणाऱ्या मुली वैद्यकीय, तर मुलं वाणिज्य (कॉमर्स) शिक्षण घेत असत.

पदवी प्राप्त केल्यावर मात्र निकोलय यांना जीवशास्त्राची आणि जनुकशास्त्राची (जेनेटिक्स) गोडी लागली. त्यानंतर ते एका शेतकी संस्थेत कीड पडण्यापासून पिकांचे संरक्षण कसे करता येईल यावर संशोधन करू लागले. कीड आणि विविध रोगांपासून आत्मरक्षण करणारी बियाणे कशी तयार करता येतील? अशा प्रकारची क्षमता असलेली पिके जगात कुठे घेतली जातात का? जगात एकूण किती प्रकारची धान्य उगवतात? नैसर्गिक धान्योत्पदनात जगात कुठला भूभाग अग्रेसर आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे व्रतच त्यांनी घेतले आणि सुफळ संपूर्णही केले.

अनेक पिके पारंपरिक पद्धतीने घेताना, रोगांना बळी पडताना त्यांनी पाहिली आणि त्यावर उपाय म्हणजे पिकांचे जनुकशास्त्र जाणून बियाण्यांवर प्रयोग करणे त्यांना महत्त्वाचे वाटले. त्याकाळी इंग्लंडमध्ये हॉर्टिकल्चरिस्ट (बागायत तज्ञ) रॉबर्ट रीगल तसेच विल्यम बेटसन कार्य करीत होते. वॅविलॉव यांनी त्यांचं मार्गदर्शन घेतलं. इंग्लंडमध्ये त्यांनी तृणधान्यांचा (मिलेट्स) अभ्यास केला. तृणधान्यांची रोगप्रतिकारकशक्ती तुलनेने जास्त असते. विपरित हवामानाला तोंड देत ती तग धरतात असं त्यांच्या लक्षात आलं. रीगल यांच्यासह त्यांनी उत्तम प्रजातीच्या गव्हावर काम केलं. रशियात परतताना त्यांना इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीत केलेल्या पीक-बियाणे संशोधनाचा फायदा झाला होता. बेटसन यांनी प्रथमच जेनेटिक्स नावाची नवसंकल्पना मांडली होती.

युरोपात संशोधन करताना वॅविलॉव यांनी संशोधन करून बनवलेली रोगप्रतिबंधक बियाणे घेऊन येणारी बोट पहिल्या महायुद्धात बुडाली. त्यामुळे निराश न होता त्यांनी स्वदेशात आल्यावर गव्हाचं शक्तिशाली वाण शोधून काढलं. ते बुरशीरोधक होतं. त्यामुळे त्यांना सारामॉव विद्यापीठात प्राध्यापकपद मिळालं. रानावनांत आपोआप उगवणाऱ्या धान्यांवर त्यांनी प्रयोग करण्याचं ठरवलं. त्यासाठी जगभ्रमंतीची गरज होती. विविध देशांत फिरताना भाषेची, जेवणाची, राहण्याची आणि बदलत्या हवामानाची अडचण तर होतीच, पण इराणमध्ये तर ‘हेर’ समजून त्यांना काही काळ अटकेतही रहावं लागलं. त्यांचं संशोधन तरीही सुरूच होतं. जगभर हिंडून त्यांनी शेकडो वनस्पतींच्या, पिकांच्या बिया, झाडांची खोडं, फुलं, पानं, फळं या सगळय़ांचे नमुने जमवले.

अडचणींचे डोंगर तर पदोपदी आडवे येत होते, पण हार न मानता निकोलय वॅविलॉव काम करीत राहिले. अफगाणिस्तानमध्ये तर ट्रेनच्या दोन डब्यांमधल्या बफरवर पडल्याने काळच आला होता. अशा अनेक कठीण प्रसंगांतून ते वाचले आणि मानवजातीसाठी त्यांनी गव्हाचे 36 हजार नमुने गोळा केले. शेंगा देणाऱ्या वनस्पतींचे 13 हजार, तर फळभाज्यांचे 12 हजार नमुने जमवले. अशा अनेक प्रकारच्या खाद्य धान्य आणि वनस्पतींच्या बियाण्यांची ‘बँक’ असावी असं त्यांच्या मनानं घेतलं. काय झालं त्याचं? त्याविषयी आणि सध्याच्या जगातील सुरक्षित बियाणं बँकेविषयी पुढच्या लेखात वाचू या.