कथित मद्य धोरण घोटाळ्याचा पैसा गेला कुठे? केजरीवाल आज न्यायालयासमोर करणार गौप्यस्फोट

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळय़ाप्रकरणी मोदी सरकारने ईडीच्या आडून शिखंडी डाव टाकून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात डांबले. गेल्या दोन वर्षांत ईडीने आपच्या नेत्यांच्या घरांसह विविध ठिकाणी तब्बल 250 धाडी टाकल्या. परंतु एक रुपयाही मिळाला नाही. हा पैसा नेमका कुठे गेला, त्याचे काय झाले? याचा गौप्यस्फोट आज स्वतः अरविंद केजरीवाल न्यायालयासमोर करणार आहेत, जनतेला सत्य सांगणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांचा संदेश लोकांना वाचून दाखवला. याबाबतचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून मोदी सरकारने सुडबुद्धीने केलेल्या कारवाईचा पर्दाफाश उद्या न्यायालयासमोर होणार आहे.

सुनीता केजरीवाल म्हणाल्या, मी तुरुंगात अरविंदजींना भेटायला गेले होते. त्यांना डायबेटीस आहे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित नाही. परंतु मोदी सरकारच्या हुकूमशाही आणि दडपशाहीविरोधात लढण्याचा त्यांचा निश्चय दृढ आहे. केजरीवाल यांनी गेल्या दोन दिवसांत तुरुंगातूनच मंत्री अतिशी यांना दिल्लीकरांच्या पाणी आणि सांडपाण्याच्या समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले. यावरही पेंद्र सरकारने खटला भरला. दिल्लीकरांच्या समस्या मार्गी लावण्याचे काम केजरीवाल तुरुंगातूनही करत आहेत, यात त्यांनी काय चूक केली, या लोकांना दिल्ली उद्ध्वस्त करायची आहे का? दिल्लीतील लोकांच्या समस्या सुटू नयेत असे या लोकांना वाटते का? असे सवाल सुनीता केजरीवाल यांनी पेंद्र सरकारला केले.

250 धाडी टाकूनही काहीच मिळाले नाही

ईडीने गेल्या दोन वर्षांत मनीष सिसोदिया, संजय सिंह, सत्येंद्र जैन यांच्या घरांवर तसेच अनेक ठिकाणी तब्बल 250 धाडी टाकल्या. परंतु एक रुपयाही त्यांना मिळाला नाही. अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी केवळ 73 हजार रुपये मिळाले. त्यामुळे दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळय़ातील पैसा नेमका गेला कुठे? असा प्रश्न ईडीला पडला असेल. याचे उत्तर उद्या गुरुवारी स्वतः मुख्यमंत्री न्यायालयासमोर देणार आहेत, असे सुनीता केजरीवाल यांनी सांगितले.

अटकेप्रकरणी ईडीकडून 2 एप्रिलपर्यंत उत्तर मागवले

अरविंद केजरीवाल यांनी अटकेला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच अंतरिम जामीन मिळण्यासाठीही याचिका केली आहे. याबाबत न्यायालयाने येत्या 2 एप्रिलपर्यंत ईडीला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच केजरीवाल यांच्या दोन्ही याचिकांवर आता 3 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. दोन्ही याचिकांवर आम्हाला सविस्तर उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची विनंती ईडीची बाजू मांडणारे वकील एसव्ही राजू यांनी केली, तर हे विलंबाचे डावपेच असल्याचा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ईडीला उत्तर देण्यासाठी 2 एप्रिलपर्यंत वेळ देण्यात आला.