स्मृतिस्थळावरील मिंध्यांचा गोंधळ; कडवट शिवसैनिकांना पोलिसांच्या नोटिसा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला स्मृतिस्थळावर मिंध्यांच्या पिट्टय़ांनी गोंधळ घातला होता. मात्र या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी निष्ठावंत शिवसैनिकांवर गुन्हा नोंद केला असून शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेशी गद्दारी करणारे खोके सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्मृतिस्थळावर आले होते. ते गेल्यानंतरही काही मिंधेसमर्थक तिथे थांबले. दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी हे स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले. त्यांना पाहताच मिंधेसमर्थकांनी डिवचण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांच्या पाठोपाठ तेसुद्धा स्मृतिस्थळावर घुसण्याचा प्रयत्न करू लागले. त्याला शिवसैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी 60-70 जणांविरोधात गुन्हा नोंद केला असून शिवसेना पदाधिकाऱयांना पोलीस नोटिसा पाठवत आहेत. दुसरीकडे मिंधे समर्थकांवर मात्र कारवाईस टाळाटाळ केली जात आहे.