NOTA ला सर्वाधिक मतं मिळाली तर निवडणूक रद्द होणार? SC ची ECI ला नोटीस

लोकसभा निवडणूक सुरू असून गुजरातमधील सूरत येथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. निवडणूक आयोगाने काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद केला आणि त्यानंतर इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजप उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. NOTA ला उमेदवार मानावे आणि बिनविरोध होणारी निवडणूक रद्द करून नव्याने निवडणूक घ्या, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागवले आहे.

शिव खेडा नावाच्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती. यात NOTA लाही काल्पनिक उमेदवार मानावे आणि जर NOTA ला सर्वाधिक मतं मिळाली तर त्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सूरतमध्ये झालेल्या बिनविरोध निवडणुकीचेही उदाहरण देण्यात आले.

Lok Sabha Election 2024 : ना मतदान, ना मतमोजणी; निवडणुकीआधीच झाला खासदार

याचिकेमध्ये अशीही मागणी करण्यात आली होती की एखाद्या उमेदवाराविरोधात एकानेही अर्ज दाखल केला नाही अथवा इतर उमेदवारी अर्ज मागे घेतला तर तिथे बिनविरोध निवडणूक होऊ नये. कारण लोकांकडे NOTA चाही पर्याय आहे. अशा मतदान प्रक्रिया पार पाडावी आणि संबंधित उमेदवाराला NOTA पेक्षा कमी मतं मिळाली तर त्याला पुढील 5 वर्ष निवडणूक लढवण्याची बंदी घालावी, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली. याप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून उत्तर मागवले आहे.