जलतरण तलाव शुल्कवाढीत ठेकेदाराची मनमानी; सातारकरांमध्ये संताप; शुल्कात अवाच्या सवा वाढ

सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे शुल्क अवाच्या सवा वाढवण्यात आल्याने जलतरणपटूंमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हा जलतरण तलाव ठेक्यावर दिला असल्याने शुल्क आकारणीत ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. हे शुल्क सर्वसामान्य जनतेला परवडत नसल्याने त्यांच्या मुलाबाळांना पोहण्याच्या आनंदाला मुरड घालावी लागत आहे.

सातारा शहरामध्ये उन्हाळ्यात पोहण्याची हौस भागवण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. काही वर्षांपूर्वी सातारा नगरपालिकेचा भवानी तलाव उपलब्ध होता. मात्र, नगरपालिकेने त्याच्या अद्ययावतीकरणास नकार देऊन भवानी तलावाची शोभा घालवली आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव हा ‘एके ग्रुप’ या पुणे येथील कंपनीला भाडेतत्वावर देण्यात आला आहे. सध्या येथे वेगवेगळ्या वयोगटासाठी पाच बॅचेस चालतात. मात्र, गतवेळेला असणारे पंधराशे रुपये शुल्क आता 2200 रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे सातारकरांमध्ये तीव्र नाराजी आहे.

हा जलतरण तलाव अलीकडे वादाचे केंद्र बनला आहे. जलतरण तलावाच्या सुविधा साधारण दर्जाच्या असताना ठेकेदाराकडून सातारकरांना आता प्रतिक्यक्ती 2200 रुपये मोजण्याची वेळ आली आहे. सातारकरांना अल्प दरामध्ये जलतरणाची सुविधा मिळावी, अशी मागणी होती. तशी अनेक निवेदने जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांना देण्यात आली होती. मात्र, जलतरण तलाव ठेका तत्वावर देण्यात आल्याने ठेकेदार ठरवेल ती फी, असे नियम झाले आहेत. परिणामी सर्वसामान्य घरातील बच्चे कंपनीला उन्हाळ्यामध्ये पोहण्याच्या आवडीला मुरड घालावी लागत आहे.

सातारा शहरालगतच्या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध असणारे धरण क्षेत्र, विहिरी-तलाव येथे तरुणवर्ग पोहायला जात असून, त्यामध्ये पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. परवाच उरमोडी धरण क्षेत्रात मुंबई येथील 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे काही वर्षांपूर्वी सातारा शहरामध्ये खासगी जलतरण तलाव होता. मात्र, विकसनाच्या नावाखाली तोही बंद करण्यात आला. आता सातारा शहरामध्ये शाहू स्टेडियमचा एकच जलतरण तलाव उपलब्ध आहे. मात्र, त्याची फी सर्वसामान्यांना परवडणारी नसल्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे.

पुण्या-मुंबईच्या तुलनेत शुल्क अत्यल्प
ठेका घेणारी एके ग्रुप ही कंपनी पुण्याची आहे. पुणे-मुंबई येथील जलतरण तलावासाठीच्या शुल्क दराच्या तुलनेने येथील शुल्क अत्यल्प आहे. तसेच तलावासाठी करावे लागणारे फिल्टरेशन, त्याची देखभाल आणि प्रशिक्षकांचे मानधन यातूनच सर्व खर्च भागवायचा आहे. याचा विचार करून फीमध्ये ही वाढ करण्यात आली आहे, असे सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी सांगितले.