मानवी तस्करी करणारी टोळी गजाआड 

थायलँड येथे नोकरीच्या नावाखाली मानवी तस्करी करणाऱया टोळीच्या दोघांना क्राईम ब्रँच युनिट 8 ने बेडय़ा ठोकल्या. जेरी जेकब आणि गॉडफ्री अल्वारेस अशी त्यांची नावे आहेत.

ठाणे येथे राहणाऱया तरुणाने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता. दोन वर्षांपूर्वी त्याला परदेशात नोकरीची संधी आली होती. थायलंड येथे सुरू असलेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांना गुंतवणूक करण्यास लावायचे अशा प्रकारची ती नोकरी होती. जास्त पगार आणि परदेशी नोकरी असल्याने त्या तरुणाने नोकरीसाठी होकार दिला. त्यानंतर तो नोकरीसाठी थायलंड येथे गेला. तेथे हिंदुस्थानातील काही तरुणदेखील आले होते. त्या तरुणाचे सोशल मीडियावर बनावट खाते तयार केले गेले. त्या खात्याच्या माध्यमातून विदेशी नागरिकांना क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूकीस भाग पाडले जात होते.

 सुरुवातीला त्या तरुणाला दोन महिने पगार दिला नव्हता. या त्रासाला कंटाळून त्या तरुणाने हिंदुस्थानात पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या तरुणांना एका ठिकाणी नेऊन डांबून ठेवून बेदम मारहाण केली. काही दिवसांपूर्वी त्या तरुणाने याची माहितीचा हिंदुस्थानी दूतावासाला ई-मेल केला. तेथे सुरू असलेल्या कॉल सेंटरची माहिती दिली. त्या तक्रारीची दखल घेऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने तेथे छापा टाकला. छापा टाकून तक्रारदार तरुणांसह काहींची सुटका केली. त्यांना हिंदुस्थानात पाठवण्यात आले. मुंबईत आल्यावर त्या तरुणाने विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. याचा समांतर तपास युनिट 8 ने सुरू केला. सहाय्यक आयुक्त महेश देसाई यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना जेरी आणि गॉडफ्रीची माहिती मिळाली. पोलिसांनी बोरिवली येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. ते दोघे लाओस येथे एका पंपनीत काम करत होते.