दिल्ली डायरी – राजस्थान पोटनिवडणुकीचा ‘दे धक्का’!

>> नीलेश कुलकर्णी

राजस्थानातील करणपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महिनाभरापूर्वी बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपचे उमेदवार व तेथील नवेकोरे मंत्री सुरेंद्रपालसिंग टीटी यांना दारुण पराभव पत्करावा लागला. त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. अर्थात भाजपच्या पराभवाला अंतर्गत मतभेदांची किनार दिसते. त्यातूनच या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून ‘दे धक्का’ दिला गेला असावा.

राजस्थानातील श्री गंगानगर जिल्हय़ातील करणपूरसारखा मतदारसंघ एरवी कोणाच्या खिजगणतीतही असण्याचे कारण नाही. मात्र विधानसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसलेला नसतानाच तिकडे पोटनिवडणूक झाली. याचे कारण म्हणजे तिथले काँग्रेस उमेदवार व तत्कालीन आमदार गुरमित सिंह कुन्नर यांचे झालेले अकाली निधन. काँग्रेसने राजकीय हुशारी दाखवत गुरमित यांचे चिरंजीव रूपिंदरसिंग यांना उमेदवारी दिली. त्यांनी भाजपचे सुरेंद्रपाल सिंग यांचा बारा हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. अर्थात सहानुभूतीनेही काँग्रेसला तारले. त्याच वेळी जनतेने भाजपच्या संधीसाधू भूमिकेला नाकारले.

काहीही करून निवडणुका जिंकण्याचे जे एक भयंकर तंत्र भाजपने विकसित केले आहे, त्याची झलक या पोटनिवडणुकीतही दिसली. राजस्थानातील जनतेने प्रचंड बहुमताने सत्तेवर बसवल्यानंतर खरे तर भाजपला राक्षसी राजकीय महत्त्वाकांक्षा दाखविण्याची गरज नव्हती. ही पोटनिवडणूक भाजपला प्रतिष्ठsची करण्याची गरजही नव्हती. त्यांच्याकडे पुरेसे बहुमत आहे. मात्र तरीही ही एक जागा जिंकण्यासाठी पोटनिवडणुकीपूर्वीच सुरेंद्रसिंग यांना मंत्री बनवून जनतेला प्रभावित करण्यात आले. नैतिकता व आचारसंहिता अशा दोन्ही गोष्टी खुंटीला टांगून ठेवण्यात आल्या. मात्र जनतेचे न्यायालय हे लोकशाहीत अंतिम असते. जनतेने खुंटीला टांगलेल्या या दोन्ही बाबी खाली उतरवल्या आणि भजनलाल यांच्या शानदार सुरुवातीला या पराभवाने ‘नमनालाच घडाभर तेल’ ओतले.

राजस्थानात मंत्री पराभूत झाल्याने त्याची चर्चा अधिक होणे स्वाभाविक होते. या पराभवामुळे काँग्रेसच्या गोटात जितके ‘मन मे लड्डू’ फुटले नसतील त्यापेक्षा अधिक वसुंधरा गोटात आनंदी आनंद झाला असेल. मुख्यमंत्रीपदाकडे चातकाप्रमाणे वाट पाहत बसलेल्या वसुंधराराजेंना धक्का देत दिल्लीकरांनी भजनलाल यांच्यासारख्या पहिल्यांदाच आमदार झालेल्या तरुण नेत्याला संधी दिली. त्यामुळे तशाही वसुंधराबाई खट्टूच झाल्या आहेत. काही राजकीय पुनर्वसन होईल, ही त्यांची आशाही मावळत चालली आहे. अशा वातावरणात वसुंधरांनी आपले राजकीय उपद्रव मूल्य या निवडणुकीत वापरलेले दिसते आहे. अर्थात या एका पराभवाने काही भजनलाल शर्मांचे आसन डळमळीत होणारे नसले तरी पुढची वाट सहजसोपी नाही, याची जाणीव या पोटनिवडणुकीने त्यांना नक्कीच करून दिलेली आहे.

और एक बाबू कतार में!
कोणत्याही राजकीय पक्षात कार्यकर्ता ते मंत्री, मुख्यमंत्री किंवा सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास होत असतो. मात्र बाबू मंडळींचा मंत्रीपदी राज्याभिषेक करण्याचे ‘मोदी मॉडेल’ सध्या जोरात आहे. बरं, एकटय़ा जयशंकर यांचा सन्मान्य अपवाद वगळला तर आजवर मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात केलेली रिटायर बाबूंची भरती ही खोगीर भरती ठरलेली आहे. आर.के.सिंग, हरदीप पुरी, सत्यपाल सिंग, अर्जुनराम मेघवाल अशी अपयशी बाबू मंत्र्यांची लांबलचक यादी आहे. आता त्यात माजी परराष्ट्र् सचिव हर्षवर्धन सिंगला यांची भर पडण्याची सुस्पष्ट चिन्हे दिसत आहेत. देशात वाजत गाजत ठेवलेल्या ‘जी-20’ संमेलनावेळी हे महाशय त्या संमेलनाचे समन्वयक होते. शासकीय सेवेत होते. त्यानंतर ते निवृत्त झाले. निवृत्त झाल्यापासून त्यांनी ‘म्हारो प्यारो देस’ म्हणत आपला मुक्काम पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंगला हलवला आहे. दार्जिलिंगमध्ये छोटय़ा मोठय़ा सभा व बैठकांशिवाय काही सामाजिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती नजरेत भरणारी आहे. ममता बॅनर्जींच्या राज्यात एका बाबूला राजकारणात सक्रिय करण्यामागेही अनेक उद्देश आहेत. सिंगला यांनी दार्जिलिंगमध्ये विजयाचा झेंडा रोवला तर त्यांचे मंत्रीपद पक्के मानायला हवे. कारण सध्या मंत्रीपदासाठी बाबूंचीच चलती आहे.

‘खान मार्केट’वर भगव्या रंगाचे गारूड
राजधानीतले खान मार्केट म्हणजे एक व्यापार उदीम व लब्ध प्रतिष्ठतांच्या बैठकीचे विलक्षण असे ठिकाण. शेजारीच असलेला लोधी गार्डनचा रम्य परिसर आणि खान मार्केटमधली उच्चभ्रूंसाठीची दुकाने, रेस्टारॅंट यामुळे केवळ देशातल्याच नाहीत तर जगभरातल्या प्रतिष्ठत मंडळींसाठी खान मार्केट हे एक ‘बसण्या’चे ठिकाण आहे. या खान मार्केटचे इतके महात्म्य वर्णन करण्याचे कारण म्हणजे तसे एरवी कॉस्मोपोलिटन, लिबरल आणि ग्लोबल लूक असणाऱया या खान मार्केटवर सध्या भगव्या रंगाने गारूड घातलेले आहे. देशभरात राममंदिर उद्घाटनाचा सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला भाजपच्या कृपेने धार्मिक अधिष्ठान लाभण्याऐवजी इव्हेंटचे अधिष्ठान मिळालेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या खान मार्केटचे रूपडे बदलले जात असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. खान मार्केटचा फेरफटका मारला तर एरवीचा त्याचा कॉस्मोपोलिटन लूक बदलून भगवा लूक चढल्याचे सहज दिसून येईल. अर्थात प्रभू रामचंद्र हे सर्वांचेच आराध्य आहेत. त्यात गैर असे काही नाही. त्यामुळेच खान मार्केटमधील व्यापारी मंडळींनी 22 तारखेला उद्घाटनाच्या दिवशी तिकडे एका आरतीचेही आयोजन केले आहे. त्यामुळे हा भगवा रंग अधिक गहिरा होणार आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुघल शासकांची नावे असलेल्या रस्त्यांची नावे बदलण्यात आली. मात्र अजून तरी खान मार्केटने आपले दुसऱयांदा ‘बारसे’ करू दिले नव्हते. कदाचित राममंदिर उद्घाटनानंतर त्याचाही ‘मुहूर्त’ मुक्रर केला की काय? अशी शंका वाटण्याइतपत खान मार्केटचा ‘रंग’ बदलला आहे हे खरे.