दखल – सीकेपी समाजग्रंथ

>> दिलीप गडकरी

सीकेपी समाज संस्थेची स्थापना कै. गंगाधरराव माधव चिटणवीस, कै. काशीनाथ बाबाजी प्रधान, कै. मल्हार खंडेराव चिटणीस यांनी 1886 साली केली. आपल्या समाजाचा इतिहास ग्रंथ रूपाने प्रकाशित व्हावा असे त्यांना वाटत होते. ज्ञातीतील कै. बाळकृष्ण आत्माराम गुप्ते, रामराव नारायण प्रधान (विळेकर), कै. त्रिंबक वासुदेव गुप्ते, अमृतराव आबाजी कर्णिक इत्यादी इतिहासकारांनी व्यक्तिगत पातळीवर सीकेपी समाजाचा इतिहास लिहिला होता. 1968 साली ज्ञातीच्या अखिल भारतीय स्तरावरील मध्यवर्ती संस्थेची स्थापना झाल्यापासून सीकेपी समाजाचा अधिक माहितीसह इतिहास लिहून काढावा असे ठरत होते, परंतु ते खर्चिक तर होतेच पण त्यासाठी समाजाबद्दल आपुलकी असणारा, अभ्यासू व चिकाटी असलेला योग्य माणूस असणे गरजेचे होते. 1975 साली मध्यवर्ती संस्थेने एक समिती नेमून हे काम करण्याची जबाबदारी दिली. त्यानंतर अनेक वर्षांनी निवृत्त असिस्टंट पोलीस कमिशनर प्र. ल. मोकाशी यांनी ही इतिहास लेखनाची धुरा स्वीकारली. त्यांनी 226 मराठी व 80 इंग्रजी ग्रंथ वाचून, तसेच अनेकांच्या मुलाखती घेऊन 1990 साली अंदाजे चार हजार पाने हस्तलिखित तयार केली व त्यातूनच 860 पानी आकर्षक ग्रंथ तयार झाला. 106 वर्षांनंतर सीकेपी समाज संस्थापकांचे स्वप्न साकार झाले.

यानंतर मूळ ग्रंथाचे व ग्रंथ निर्मात्याचे महत्त्व कमी होऊन देता पृष्ठसंख्या व किंमत असा दोन्हीरित्या अंकात बदल करीत संजीव सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंकाची नव्याने निर्मिती केली.नवीन ग्रंथ वाचताना वाचकांच्या लक्षात येते की, संजीव सुळे यांनी ग्रंथाच्या मूळ हेतूला बाधा न आणता नव्याने मांडणी केली आहे. मूळ ग्रंथातील लेखांचे त्यांनी तीन विभागांत वर्गीकरण केले. ज्ञातीचा इतिहास, विविध क्षेत्रांतील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे आणि संस्थात्मक इतिहास अशा तीन विभागांमुळे माहितीची सुसूत्रपणे मांडणी झाली आहे. ग्रंथाचे मूळ स्वरूप लक्षात घेत मोकाशी यांनी अपार कष्ट घेतल्यानेच मूळ 860 पानी ग्रंथाचे रूपांतर 336 पानांत करता आले. सीकेपी समाजातील अनेक नामवंत व्यक्तींनी सर्वच क्षेत्रांत प्रावीण्य मिळवून सीकेपी समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. समाजाच्या नव्या पिढीलाही समाजाच्या इतिहासाबद्दल माहिती उपलब्ध करून देणारा असा हा ग्रंथ आहे.