ठसा – गंगू रामसे

>> दिलीप ठाकूर

सत्तर आणि ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत रामसे ब्रदर्स अर्थात रामसे बंधूंची आपली एक नावापासून पोस्टरपर्यंत ‘डरावनी फिल्मे’ अशीच एक ओळख होती. आपले एक स्थान होते. भलेही त्यांच्या त्या ‘डरना जरुरी है’ पिक्चर्सना समीक्षकांनी फारसं महत्त्व दिले नाही. त्या एकूण सात रामसे बंधूंमधील दुसरा भाऊ गंगू रामसे यांचे 7 एप्रिल रोजी मुंबईत निधन झाले. हे रामसे कुटुंब फार पूर्वी गिरगाव चौपाटीजवळील भवन्स कॉलेजजवळ राहत असे. रामसे बंधूंच्या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे कधी भूत पिशाचाची थरारक गोष्ट, तर कधी एकामागोमाग एक धक्कादायक खून अशी पटकथा.

मुंबईसारख्या ‘ए’ श्रेणी केंद्रावर त्यांचे पिक्चर्स तीन आठवडे चालले तरी भारी वाटे. त्यांचा हाऊसफुल्ल पब्लिक ‘बी’ (छोटी शहरे) आणि ‘सी’ (ग्रामीण भाग) येथे पसरलेला आणि तोही हुकमी. हे सात रामसे बंधू म्हणजे कुमार, गंगू, केशू, तुलसी, किरण, श्याम व अर्जुन.
रामसे ब्रदर्सचे वडील एफ. यू. रामसे अर्थात फतेहचंद रामसिंघानी हे स्वातंत्र्यपूर्व काळात कराची आणि लाहोरमध्ये रेडिओचा व्यवसाय करायचे. इंग्रजांना त्याचे नाव उच्चारणे अवघड वाटले म्हणून ते त्यांना रामसे म्हणत. फाळणीच्या वेळी ते कुटुंबासह मुंबईत आले आणि त्यांनी रेडिओ आणि कपडय़ांचा व्यवसाय सुरू केला. फतेहचंदना आपल्या मुलांनीही असेच करावे असे वाटत नव्हते. त्यांच्या कुटुंबासाठी चित्रपट निर्मितीचे त्यांचे स्वप्न होते. सुरुवातीला त्यांनी काही चित्रपटांना वित्तपुरवठा करण्यास सुरुवात केली आणि लवकरच स्वतः चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. फतेहचंद यांच्या असे लक्षात आले की, चित्रपटाशी संबंधित तंत्रज्ञ (म्हणजे छायाचित्रण, संकलन वगैरे) आणि कामगार आपापले काम करतात आणि त्यामुळे चित्रपटाचे बजेटही वाढते. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलांना चित्रपट माध्यमाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. गंगू रामसे यांनी सहाय्यक दिग्दर्शक व छायाचित्रणकार या जबाबदाऱया स्वीकारल्या. रामसे बंधूंच्या चित्रपटात छायाचित्रण ही खूपच आव्हानात्मक गोष्ट होती. बरीचशी दृश्ये मध्यरात्रीच्या काळोखात घडत आणि तांत्रिकदृष्टय़ा काळोखातील दृश्यं चित्रीत करण्यासाठी अतिशय खबरदारीने व जास्त प्रकाश योजना करावी लागे. त्या काळातील पॅमेरे आणि सुविधाही पारंपरिक असत. पण गंगू रामसे यांनी भयपट/ भूतपट याचा मूड आपल्या पॅमेऱयात उत्तम टिपत वाटचाल केली.

एफ. यू. रामसे यांनी एकेक चित्रपट निर्माण करीत वाटचाल सुरू केली होती. त्यात या सातही बंधूंची जडणघडण होत गेली. सर्वप्रथम जगदीश गौतम दिग्दर्शित ‘शहीद-ए-आझम’ (1954) हा देशभक्तीवरील चित्रपट निर्माण केला. त्यानंतरच्या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन विश्राम बेडेकर यांनी केले. ‘रुस्तम-ए-सोहराब’ (63) आणि ‘एक नन्ही मुन्नी लडकी थी’ (70) हे ते चित्रपट होत. एक ‘नन्ही मुन्नी’च्या यशानंतर रामसे ब्रदर्सना जणू यशाचा फॉर्म्युलाच सापडला. श्याम व तुलसी हे रामसे ब्रदर्स दिग्दर्शनात उतरले. त्यांचा पहिला हॉरर पिक्चर ‘दो गज जमीन के नीचे’ ( 1972). हा चित्रपट अवघ्या साडेतीन लाखांत आणि पंचेचाळीस दिवसांत बनवला. तो यशस्वी ठरला. अंधेरा, दरवाजा, और काwन, सबूत, दहशत, सन्नाटा, हॉटेल, घुंगरू की आवाज या चित्रपटांसाठी गंगू रामसे यांनी सहाय्यक दिग्दर्शक व छायाचित्रणकार म्हणून वाटचाल केल्यावर पुराना मंदिरपासून पूर्णपणे छायाचित्रणकार म्हणून ‘पह्कस’ ठेवला. त्यात आपला प्रभाव दाखवला. त्यानंतर टेलिपह्न, सामरी, तहखाना, ओम, डाक बंगला, वीराना, पुरानी हवेली, बंद दरवाजा, इन्स्पेक्टर धनुष, अजूबा कुदरत का, द मॉन्स्टर, तलाशी. यात ’खोज’ हा सस्पेन्स थ्रिलर शेवटपर्यंत रंगला होता. यातील ‘सामरी’ हा त्रिमिती (थ्रीडी अर्थात थ्री डायमेन्शन) असा तांत्रिक करामतीचा चित्रपट होता. त्याचे शिक्षण घेणे आवश्यक होते. चित्रपट खास रामसे शैलीचा भयपट होता. गंगू रामसेंनी त्यात आपली कामगिरी उंचावली.

रामसे ब्रदर्सनी मनोरंजन उपग्रह वाहिन्यांच्या काळात भयप्रद मालिकांच्या निर्मितीत रस घेतला. त्यातही त्यांनी उत्तम यश प्राप्त केले आणि गंगू रामसे यांच्या छायाचित्रणाला भरपूर वाव मिळाला. ‘झी हॉरर शो’, ‘सॅटर्डे सस्पेन्स’, ‘नागीन’, ‘झिम्बो’ या त्यांच्या मालिकांचे छायाचित्रणकार गंगू रामसे होते. गंगू रामसे यांचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांना अन्य निर्मात्यांच्याही चित्रपटांच्या छायाचित्रणाची चांगली संधी मिळाली. अक्षय कुमारचे ते फेवरेट छायाचित्रणकार ठरले. त्याच्या चित्रपटातील देशविदेशातील जमिनीवरील, समुद्रातील, हवेतील मारहाण दृश्यांच्या चित्रीकरणाचा खास उल्लेख हवा. हे चित्रपट होते ‘मिस्टर बॉण्ड’, ‘खिलाडीयों का खिलाडी’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘मिस्टर अॅण्ड मिसेस खिलाडी’, ‘पांडव’. दक्षिणेकडील अभिनेता विष्णुवर्धन याच्या अनेक तामीळ चित्रपटांचे छायाचित्रण गंगू रामसे यांचेच. सैफअली खानचा पहिला चित्रपट उमेश मेहरा दिग्दर्शित ‘आशिक आवारा’चेही छायाचित्रण त्यांचेच. आपण सात रामसे बंधूंपैकी एक आहोत हे नाते जपतानाच गंगू रामसे यांनी स्वतःचाही एक मार्ग चोखळला आणि आपल्या कार्यकर्तृत्वाची व्याप्ती वाढवली.